घरफिचर्सराजकीय नेते सोशल मीडियाच्या प्रेमात !

राजकीय नेते सोशल मीडियाच्या प्रेमात !

Subscribe

अमेरिकी लोकांपेक्षा जास्त भारतीय सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे निवडणुकांसारख्या ‘मास अपीलिंग इव्हेंट’मध्ये या माध्यमांचा वापर न होता तरच नवल. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी सोशल मीडियाचा वापर करतात तरी कसा? कधीपासून? आणि कुठे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी फेसबुक आणि ट्वीटर ही दोन माध्यमं आणि संशोधनाच्या ‘रॅण्डम सॅम्पलिंग’ पद्धतीनुसार या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा आढावा घेतला. त्यावेळी अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स समोर आल्या. त्यातून ही मंडळी सोशल मीडियाच्या प्रेमात कशी आकंठ बुडाली आहेत, ते दिसून येते.

ल्लीची पिढी सोशल मीडिया सॅव्ही वगैरे आहे असं म्हटलं जातं. देशात सर्वाधिक तरूण लोकसंख्या आहे, असंही आकडेवारी सांगते. त्यामुळे साहजिकच मतदानात या तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आणि परिणामकारक ठरतो. याच तरूण मतदारांना शक्य तितक्या सर्व मार्गांनी आपलंसं करण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी प्रयत्न करत असतात. साधारणपणे मतदारांचा वावर जिथे जास्त असतो, अशा ठिकाणी मार्केटिंग केल्यास सर्वाधिक फायदा मिळतो असं व्यावहारिक गणित सांगतं. राजकारणातही हे तत्व लागू पडतं. पूर्वी मोठमोठाल्या सभा, मंडपांमधली गर्दी, कार्यक्रम, सोशल गॅदरिंग, बैठका अशा ठिकाणी ही मतदार मंडळी सापडायची. पण आता हीच मंडळी सापडतात सोशल मीडियावर. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियावरचा प्रचार ‘सोशल’ मतदारांच्या भाषेत ‘क्रुशल’ ठरला. फंडा जुनाच होता, फक्त त्याचं ठिकाण किंवा व्यासपीठ बदललं होतं. सोशल मीडिया!


महत्त्वाची निरीक्षणं…

२०१४ हे वर्ष सोशल मीडियासाठीदेखील टर्निंग पॉइंट ठरलं
राष्ट्रीय पक्ष नसूनही ‘आप’ला सोशल मीडियावर भाजपखालोखाल पाठिंबा
काँग्रेसनं राहुल गांधींच्याही आधी प्रियांका गांधींचं फेसबुक पेज बनवलं होतं
निवडणुकीच्या १ वर्ष आधी २०१३ मध्ये सर्वाधिक अकाऊंट्स झाले सुरू
अनेक फॅन अकाऊंट्स असणार्‍या उद्धव ठाकरेंचं अजूनही ट्वीटर अकाऊंट नाही
प्रचंड फॉलोअर्स घेणारी नेतेमंडळी ट्वीट करण्यात मात्र अजूनही मागेच
सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून ट्वीटरचा सर्वाधिक वापर
एआयएमआयएमच्या असादुद्दीन ओवैसींना सोशल मीडियावर वाढता पाठिंबा

- Advertisement -

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर गेल्या ५ वर्षांत चित्र बरंच बदललं आहे. देशाची लोकसंख्या, तरुण मतदारांची संख्या आणि पर्यायानं सोशल मीडियाचा वापर करणार्‍या ‘नेटिझन्स’ची संख्या यात बरीच वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार एकट्या भारतात आजघडीला तब्बल ३० कोटी फेसबुक अकाउंट आहेत. आणि हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेली अमेरिका २१ कोटींवर आहे. ट्विटरसाठी हा आकडा ३४ कोटींच्या घरात आहे. तर २० ते २५ कोटी भारतीय व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. जिथे इतकी मोठी लोकसंख्या सोशल मीडियावर आहे, तिथे निवडणुकांसारख्या ‘मास अपीलिंग इव्हेंट’मध्ये या माध्यमांचा वापर न होता तरच नवल! याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी सोशल मीडियाचा वापर करतात तरी कसा? कधीपासून? आणि कुठे? हा गूढ प्रश्न उपस्थित झाला. उत्तर शोधण्यासाठी फेसबुक आणि ट्वीटर ही दोन माध्यमं आणि संशोधनाच्या ‘रॅण्डम सॅम्पलिंग’ पद्धतीनुसार देशपातळीवर आणि राज्यपातळीवर प्रसिद्ध आणि प्रभावी असणार्‍या नेत्यांच्या अकाउंट्सचा साधारण आढावा घेतला. त्यांची वैयक्तिक आकडेवारी सर्वश्रुत असली, तरी ती एकत्र केल्यानंतर काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स समोर आल्या.

दोन्ही माध्यमांवरच्या एकूण ४४ नेतेमंडळींची ८६ ऑफिशिअल अकाऊंट्स पाहिल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे २०१२ ते २०१४ या निवडणुकांच्या आधीच्या ३ वर्षांमध्ये यातली जवळपास ५० टक्के म्हणजेच ४६ अकाऊंट्स सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे भाजपपेक्षा काँग्रेस आणि इतर पक्षांच्या अकाऊंट्सचं प्रमाण जास्त आहे. कारण भाजपनं त्याआधी २००९ ते २०११ या तीन वर्षांतच ९ अकाऊंट्स सुरू करून टाकली होती. २००९पासून राजकीय पक्षांच्या या अकाऊंट ओपनिंगला सुरुवात झाली. त्याआधी यातल्या एकाही नेत्याचं किंवा पक्षाचं अकाउंट नव्हतं. निवडलेल्या नेत्यांच्याच अकाऊंट्सची ही तुलना असली, तरी साधारणपणे हाच ट्रेंड या काळात दिसून आला.

- Advertisement -

Social Media Account Chart 1

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पेज यात सर्वात जुनं आहे. ५ मे २००९ रोजी मोदींनी त्यांच्या नावाचं फेसबुक पेज सुरू केलं. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच २५ जूनला काँग्रेसकडून गांधी घराण्यातलं एक पेज तयार झालं. पण हे पेज राहुल गांधींचं नसून प्रियांका गांधींचं होतं हे विशेष! त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आधी त्यांचं ट्विटर अकाऊंट सुरू केलं. आणि त्यानंतर महिनाभरानं फेसबुक पेज! या सगळ्यात काँग्रेसचे युवराज आणि विद्यमान अध्यक्ष राहुल गांधींची फेसबुकवर एंट्री बरीच उशिरा म्हणजे २०१७ मध्ये झाली. पण त्यांचं ट्विटर अकाऊंट २०१५ पासूनच अ‍ॅक्टिव्ह होतं. मोदींच्या ट्विटरपेक्षाही दोन वर्षे आधी. पक्षीय पातळीवर इतर पक्ष बरेच उशिरा जागे झाले. जिथे भाजपचं फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंट २०१० मध्येच सुरू झालं होतं, तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, मनसे आणि शिवसेना २०१२-१३ मध्ये पक्ष म्हणून सोशल मीडियावर अवतरले. त्यामुळे भाजपचे पेज लाईक्स (१ कोटी ५७ लाख १६ हजार ३८२) आणि ट्विटरवर फॉलोअर्स (१ कोटी ८ लाख) सर्वाधिक आहेत. भाजपच्या पेजवरून झालेले ट्वीटदेखील १ लाख ८१ हजारांच्या घरात आहेत. काँग्रेस त्या मानाने बरीच मागे आहे(५८ हजार २०० ट्वीट).

या शर्यतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही काही मागे नाहीत. ९२ लाखाहून जास्त फेसबुक लाईक्स, ३ लाखाहून जास्त ट्वीटर फॉलोअर्स आणि खुद्द पंतप्रधानांपेक्षा ८ हजारांहून अधिक ट्विट्स(३० हजार २००). ट्वीट्स किंवा फेसबुकच्या बाबतीत महाराष्ट्रातले इतर नेते त्यांच्या जवळपासही नाहीत. ट्वीटर फॉलोअर्सच्या बाबतीत फक्त शरद पवारांनी (११ लाख ७० हजार) त्यांना बरंच मागे टाकलं आहे. पण असं असलं, तरी पवारांनी २०१३ पासून आत्तापर्यंत फक्त १५१६ ट्वीट्स केले आहेत. सुप्रिया सुळे(१० हजार ९००), पूनम महाजन (८ हजार ०५४), पंकजा मुंडे (४ हजार ४५४), अजित पवार (२ हजार ४३१) आणि अशोक चव्हाण (२ हजार १२२) यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्वीटरवर जास्त विश्वास दाखवल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे देशात सर्वात जुनं फेसबुक पेज मोदींचं(मे २००९) असताना सर्वात जुनं ट्विटर अकाऊंट मात्र सपाच्या अखिलेश यादव यांचं(जून २००९) आहे.

Social Media Account Chart 2

अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे सोशल मीडियावर भलतेच फेमस झालेल्या (आणि अजूनही असलेल्या) अरविंद केजरीवाल यांचं फेसबुक-ट्वीटर प्रेम आकडेवारीवरून सहज दिसतं. देशात भाजपखालोखाल सर्वाधिक ट्वीट(१ लाख २ हजार) ‘आप’ने केले आहेत. इतर पक्ष याच्या आसपासदेखील नाहीत. महाराष्ट्र वगळता इतर राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये देखील सर्वाधिक फेसबुक पेज लाईक्स (७१ लाख ६८ हजार ०१९), सर्वाधिक ट्वीटर फॉलोअर्स (१ कोटी ४० लाख ७० हजार) आणि सर्वाधिक ट्वीट (२७ हजार ५०० – मोदींपेक्षा जास्त) अरविंद केजरीवालांच्या नावावर आहेत. याशिवाय तुलना केल्यास महाराष्ट्रातली नेतेमंडळी इतर राज्यांमधल्या नेतेमंडळींपेक्षा ट्वीटरवर कमी अ‍ॅक्टिव्ह असल्याचं दिसतं.

सोशल मीडिया हे तसं तरुणांचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. पण राजकारणातली यंग ब्रिगेड मात्र या बाबतीत बरीच मागे आहे. त्यातही ट्वीटरबाबत तरुण नेत्यांमध्ये भलतीच अनास्था असावी. एकटे आदित्य ठाकरे वगळता (१८ लाख १० हजार) इतर ८ नेते फॉलोअर्सच्या बाबतीत ५० हजारांच्या घरातदेखील नाहीत. आदित्य ठाकरेंचं ट्वीटर अकाऊंट म्हणायला २०१३ पासून अ‍ॅक्टिव्ह आहे. पण आजपर्यंत त्यांनी फक्त ७ हजार ९१९ ट्वीट केले आहेत. जे राज्यातल्या यंग ब्रिगेडमध्ये सर्वाधिक आहे. अमित ठाकरेंचं तर ऑफिशिअल ट्वीटर अकाऊंटच नाहीये. तर मावळमधून आघाडीची उमेदवारी मिळालेल्या पार्थ पवार यांनी गेल्या वर्षभरात फक्त ९६ ट्वीट केले आहेत. फेसबुक पेज लाइक्सच्या बाबतीत राणेपुत्र नितेश राणेंनी बाजी मारली असून मे २०१४ पासून त्यांच्या पेजचे २ लाख ३५ हजार २०७ लाइक्स झाले आहेत.

सोशल मीडियावरचं महिला राज मात्र राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी प्रभावित केलं आहे. एकूण १२ महिला नेत्यांच्या फेसबुक-ट्वीटर अकाउंटमध्ये सर्वाधिक फेसबुक पेज लाइक्स(९५ लाख ५ हजार ९२८) राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पेजला आहेत. तर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या ट्विटरचे सर्वाधिक १ कोटी २५ लाख फॉलोअर्स आहेत. भाजपच्या सर्वच मंत्र्यांमध्ये पंतप्रधानांच्या खालोखाल सुषमा स्वराज ट्विटरवर सर्वाधिक सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रियांका गांधींनी ट्विटरवर उशिरा एंट्री केली असली, तरी अवघ्या महिनाभरात त्यांचे ३ लाख २१ हजार फॉलोअर्स झाले आहेत. आणि ते वेगाने वाढतदेखील आहेत. राज्यात भाजपच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन (२५ लाख ३९ हजार ८०१) फेसबुकवर तर सुप्रिया सुळे (६ लाख ९८ हजार) ट्विटरवर आघाडीवर आहेत.

Social Media Account Chart 3

२०१४ मध्ये भारतात लोकसभा निवडणुका होण्याच्या दोनच वर्षे आधी म्हणजे २०१२ मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारतीय सोशल मीडियासाठी तो एक बूस्टर ठरला. ज्याचा पुरेपूर वापर प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी केला. २०११-१२ च्याच सुमारास अण्णा हजारेंच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीने देशभरात विचारांची घुसळण सुरू केली होती. जनता सोशल मीडियावर व्यक्त होत होती. आणि त्याचा फायदा आम आदमी पार्टी आणि पर्यायाने अरविंद केजरीवाल यांना झाला. सोशल मीडियाची ताकद ओळखूनच २००९ ते २०१४ या ६ वर्षांमध्ये ६६ राजकीय अकाऊंट्स उघडली गेली. यातली १३ अकाऊंट्स एकट्या भाजपच्या नेत्यांची होती.

निवडणुकांच्या साधारण २ वर्षे आधीपासून म्हणजेच २०१२ पासून ही नेतेमंडळी, त्यांची फेसबुक पेजेस आणि ट्वीटर अकाऊंट्स खर्‍या अर्थानं ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाल्याचं दिसत होतं. त्यांचे लाइक्स आणि फॉलोअर्सदेखील याच सुमारास वाढल्याचं प्रकर्षानं जाणवतं. फेसबुक आणि ट्विटर अशा दोन्ही माध्यमांवर मधली फळी आणि वरच्या फळीतल्या नेतृत्वाचं वर्चस्व दिसतं. तिसर्‍या पिढीतली तरूण किंवा नवोदित नेतेमंडळी अजूनही या माध्यमांकडे गांभीर्यानं पाहात नसल्याचंच या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. पण आज ना उद्या, ही मंडळीदेखील याच माध्यमावर विसंबून राहणार आहेत. कारण, जाहीर सभांपेक्षादेखील मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरून जास्त चांगल्या पद्धतीने मतं बनवता, फिरवता आणि बिघडवता येतात, हे या माध्यमानं सिद्ध केलं आहे.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -