घरमहाराष्ट्रनाशिकग्रामीण रुग्णांसाठी टेलिमेडिसिन लाभदायी

ग्रामीण रुग्णांसाठी टेलिमेडिसिन लाभदायी

Subscribe

कळवण तालुक्यातील ग्रामीण व अदिवासी भागातल्या सहा हजारांहून अधिक रुग्णांना लाभ

ग्रामीण व अदिवासी भागातल्या रुग्णांना विविध आजारांच्या तपासण्यासाठी मोठ्या शहरातल्या हॉस्पीटलमध्ये जावे लागते. असे असताना काही वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरू टेलिमेडीसीन उपचार पद्धतीचा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना फायदा होत आहे. तज्ञांच्या सल्ल्याने आजाराचे निदान होऊन उपचार होत असल्याने टेलिमेडीसीन सेवा ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी लाभदायी ठरली आहे.

टेलिमेडीसीन पद्धतीत गंभीर रूग्णांची माहिती संकलित करून उपचाराची दिशा ठरविली जात असल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण घटले आहे. २००८ ला महाराष्ट्रात टेलिमेडीसीन नेटवर्क स्थापन झाले. ६४ पेशंट नोड आणि ८ स्पेशलिस्ट नोडची स्थापना केली. पेशंट नोड असलेल्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना टेलिमेडीसीनद्वारे उपचाराची आवश्यकता असल्यास त्याची माहिती स्पेशलिस्ट नोड असलेल्या हॉस्पिटलकडे पाठवली जाते. टेलिफोन व इंटरनेटच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांवर तज्ञांकडून सल्ला दिला जातो.

- Advertisement -

विविध प्रकारच्या आजारांसाठी तज्ञांकडून वैद्यकीय सल्ला व ग्रामीण भागातील रुग्णांचे रोगनिदानासाठी या सुविधेचा चांगला उपयोग होत आहे. टेलिमेडिसिनमध्ये टेलिफोन, इंटरनेट अथवा उपग्रह संपर्काच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन सल्ला देतात. याद्वारे रुग्णांची माहिती पाठवून रुग्णांना विशेष तज्ञांचे मत व सल्ला मोफत उपलब्ध करून दिला जात असल्याने या पद्धतीद्वारे मिळणारे उपचार रुग्णांसह ग्रामीण भागातील डॉक्टर्ससाठी देखील लाभदायक ठरत आहेत. टेलिमेडीसीनमुळे रुग्णांच्या पैशांची व वेळेची बचत होत असून ग्रामीण भागात ही टेलिमेडीसीन सुविधेचा लाभ घेणार्‍यांची संख्या वाढते आहे.

सर्वाधिक रुग्ण हे त्वचारोगाचे

नाशिक जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय,सामान्य रुग्णालय मालेगाव व उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे टेलिमेडीसीन सुविधा उपलब्ध असून कळवण उपजिल्हा रुग्णालयात मार्चअखेर पाच ते सहा हजार रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. कळवण येथे येणार्‍या रुग्णांना मुंबईच्या के.ई.एम हॉस्पीटल येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन उपचार दिले जातात. सर्वाधिक रुग्ण हे त्वचारोगाचे असून इतरही विविध आजारांवर तज्ञांचा सल्ला मागवला जातो. कळवण उपजिल्हा रुग्णालयात कळवणसह देवळा, सटाणा,सुरगाणा, पेठ, ताहराबाद, मनमाड चांदवड येथील रुग्णही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी येतात.

- Advertisement -

रुग्णांना अत्यंत लाभदायक

टेलिमेडीसीन सेवा दुर्गम व आदिवासी भागातील रुग्णांना अत्यंत लाभदायक ठरत आहे. सदर सेवा मोफत असून त्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. – डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक, कळवण

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपचार पद्धती

कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विभागात एलसीडी प्रोजेक्टर- मॉनिटर, डिजिटल व क्षकिरण स्कॅनर, वेबकॅम, प्रिंटर, इंटरनेट व वातानुकूलित अद्ययावत रूम असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पेशंट व नोड व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून उपचार पद्धती सुरु करण्यात येते. – डॉ. जयदीप भदाणे, टेलिमेडिसिन फैसिलिटी व्यवस्थाप, कळवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -