घरमहाराष्ट्रनाशिकपक्षविरोधात काम करणार्‍या पदाधिकार्‍यांचा श्रेष्ठींकडे अहवाल

पक्षविरोधात काम करणार्‍या पदाधिकार्‍यांचा श्रेष्ठींकडे अहवाल

Subscribe

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या भूमिकेवर मंथन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत १ जूनला पुण्यात होणार आहे.

पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका याविषयावर मंथन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत १ जूनला पुणे येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी निवडणुकीत पक्षविरोधी काम करणार्‍यांचा अहवालही श्रेष्ठींना देण्यात येणार असल्याचे समजते.

मोदी त्सुनामीत काँग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला. पराभवास मोदी लाटेचा आधार घेतला जात असला तरी, पक्ष कुठे कमी पडला याचे विश्लेषण पक्षांकडून करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील पराभव, तर पक्षाला धोक्याची घंटा मानला जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेला समीर भुजबळ यांचा पराभव भुजबळ कुटुंबियांना धक्का मानला जात आहे. मागील निवडणुकीत छगन भुजबळ यांनी तीन लाखांहून अधिक मते घेतली होती. यंदा समीर भुजबळ तीन लाखांचा टप्पाही गाठू शकले नाही. याउलट भुजबळ यांना लाखाचा टप्पा पार करण्यासाठी आठव्या फेरीपर्यंत शिकस्त करावी लागली. अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीला फायदा होईल, अशी अटकळ बांधली होती. मात्र, सिन्नर वगळता कोकाटे फॅक्टर मतदारांनी साफ नाकारला. वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघात छगन भुजबळांचा येवला मतदारसंघ, पंकज भुजबळांच्या नांदगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मिळालेली आघाडी भुजबळांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. ग्रामीण भागात मोदींविरोधात नाराजी असतानाही भाजपला मिळालेली ग्रामीण जनतेची साथ यामुळे मतदारराजा राष्ट्रवादीवर नाराज असल्याचेच दिसून येते.

- Advertisement -

सध्यातरी या पराभवास मोदी लाट जबाबदार असल्याचे कारण दिले जात असले तरी अनेकांनी पक्षविरोधी काम केल्याची खदखद आता बाहेर पडू लागली आहे. पक्षाच्या प्रचारात पुढे पुढे फिरणार्‍यांनी प्रत्यक्षात पक्षासाठी किती योगदान दिले, याचाही अहवाल आता तयार करण्यात येत असल्याचे समजते. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना जनतेपर्यंत जाण्यासाठी संधी मिळावी, याकरता यंदा उमेदवार आणि जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवावा अशीही पक्षातून मागणी होत आहे. या बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर १ जून रोजी पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत होणार्‍या मंथन बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

पवारांनी दिला धीर

लोकसभा निवडणूक निकालानंतर नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ आणि दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांच्याशी पवारांनी फोनवरून चर्चा चर्चा करत त्यांना अपयशाने खचून न जाता पक्ष संघटन मजबुतीसाठी पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच आमदार छगन भुजबळ यांनीही सर्व पदाधिकार्‍यांशी संवाद साधत मतदारसंघात आभार दौरा करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

- Advertisement -

जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

पक्षाची एकूणच कामगिरी बघता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. असे असेल तरी, भगव्या लाटेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदलाचे वारेही मोठ्या प्रमाणावर वाहू शकतात, असाही एक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत सध्या तरी फेरबदल अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -