घरफिचर्सशाब्बास, नितीश कुमार!

शाब्बास, नितीश कुमार!

Subscribe

भाजप बहुमताने सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यासोबत असणार्‍या एनडीए पक्षांचे मंत्रिमंडळात अस्तित्व काय असेल? याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, १८ खासदार असूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मंत्रिमंडळात किंमत मिळाली नाही. बिनमहत्त्वाचे अवजड खाते देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली. मंत्र्यांची यादी आधीच ठरली होती आणि तसे एनडीएमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या प्रमुखांना सांगितले होते. शिवसेनेप्रमाणे नितीश कुमार यांच्या १६ खासदार असलेल्या जनता दल संयुक्त पक्षालाही सेनेसारखे फार महत्त्व नसलेले खाते देण्यात आले होते.

मात्र, आपल्या पक्षाला सरकारमध्ये महत्त्व नसेल तर आम्हाला मंत्रिपदच नको, अशी ठाम भूमिका नितीश यांनी घेतली आणि ते मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीला शरीराने आले, मनाने नाही आणि आता आपल्या बिहार सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करताना फक्त आपल्या जनता दल संयुक्तच्या आमदारांना संधी दिली. सरकारमध्ये सोबत असलेल्या भाजपला काय वाटेल, त्यांना आता आपल्याबरोबर यायचे आहे की नाही याचा फारसा विचार केला नाही. राज्यात सोबत येणार असाल तर आम्ही म्हणतो ते ऐकावे लागेल. जशी तुमची केंद्रात मनमानी चालते, तशी माझ्या बिहारमध्ये मी सांगणार मला काय हवे आहे, असा आक्रमक पवित्रा घेतला. आपला मंत्रिमंडळ विस्तार करताना नितीश यांनी मोदी सरकारमध्ये भविष्यात सामील होणार नाही, अशी घोषणाही केली… शाब्बास नितीश कुमार! जे उद्धव ठाकरे यांना जमले नाही ते तुम्ही करून दाखवले. एनडीएमधील प्रादेशिक पक्ष म्हणजे भाजपच्या घरचे नोकर नाहीत, हे त्यांना ठणकावून सांगितले, हे आणखी बरे केले. नितीश कुमार यांनी हे सारे करताना एका दगडात अनेक पक्षी मारले. लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख राम विलास पासवान यांनाही दणका दिला.

- Advertisement -

बिहारमध्ये सत्तेत एकत्र असूनही आपल्या मंत्रिमंडळात पासवान यांच्या पक्षाला स्थान दिले नाही. मोदी, मोदी करत आपल्या पदरात मागच्या वेळेप्रमाणे अन्न नागरी पुरवठा हे खाते पदरात पाडताना आपल्या सोबतच्या नितीश आणि उद्धव यांचा मान राखला पाहिजे, याचा पासवान यांना विसर पडला. यामुळेच नितीश यांनी मी तुम्हाला सुद्धा विसरू शकतो, हे दाखवून दिले ते बरे केले. पुढील वर्षाच्या अखेरीस होणार्‍या बिहार विधानसभेच्या निवडणुकांची आतापासून तयारी करून घेताना राज्यभर आपला पक्ष विस्तारेल, याची पुरेपूर काळजी नितीश यांनी घेतली. भविष्यात भाजपसोबत असो नसो जनता दल संयुक्तचे अस्तित्व कायम आहे आणि पुढे ते तसेच राहील यासाठी पाऊल उचलले. शिवसेनेला हा मोठा धडा आहे. कारण मोदींचा भाजप हा अजगरासारखा आहे तो सर्वांना गिळंकृत करत पुढे जाणार आहे. त्यांना आधी काँग्रेसला संपवायची आहे आणि सोबत प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व कमी कमी करत शेवटी संपवून टाकून फक्त स्वतःचा डंका पिटायचा आहे. निवडणुका येण्यापूर्वी एनडीएच्या सर्व घटक पक्षांना मोदी आणि शहा यांनी फक्त डोक्यावर घेऊन नाचयाचे बाकी ठेवले होते. कारण त्यावेळी भाजपला या सार्‍यांची गरज होती.

हारतुरे, जेवणावळी आणि बैठका झाल्या. गळाभेटी घेऊन शाल श्रीफळ देण्यात आले. कारण वातावरण आताच्या अनाकलनीय निकालासारखे नव्हते. भाजपला २०० प्लस जागा मिळतील, असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात ३०० प्लस जागा आल्यानंतर भाजपची नीती बदलली. आता आम्ही म्हणतो तसे ऐकायचे. आम्ही सांगतो त्या अटी शर्थीवर सोबत यायचे, नाही तर तुमचा मार्ग मोकळा. उद्धव यांनी गुमान ऐकले. कारण त्यांना पुढे विधानसभेत आपल्याला एकटे लढावे लागले तर आपली मोदी वादळात नाव टिकणार की नाही, याची खात्रीच झालेली दिसते. २०१४ मध्ये वेगळे लढूनही ६३ आमदार निवडून आणले होते, याचा विसर उद्धव यांना पडला आणि मुंबई महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार असे सर्वत्र आपली दहा बोटे तुपात पाहिजे, हा व्यवहार त्यांनी आणला.

- Advertisement -

आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला तिलांजली देत. यातून फक्त सत्तेचे फायदे घ्यायचे की याला आणखी काही कारणे आहेत, हे ‘मातोश्री’ला ठाऊक! पण, लोकसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेण्यापूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना यात जमीन अस्मानाचा फरक आहे. कोणी याला सत्तेचे शहाणपण म्हणत असला तरी तडजोड करूनच आज शिवसेनेला भाजपसोबत रहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेचे सारे लक्ष लागले आहे ते चार महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर. आता तडजोड केली तर आणि मोदी यांच्या विरोधात ब्र काढला नाही तर आपल्याला बरोबरीने घेतील, अन्यथा एकट्याने आपल्या तोंडाला फेस येईल, ही भीती सतत भेडसावत असल्याने मोदींना जिवलगा म्हणण्याची वेळ उद्धव यांच्यावर आली आहे, पण नितीश कुमार यांचे तसे नाही. बिहारच्या राजकीय मातीचा गुण हा अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आहे.

तो आज फक्त मोदींविरोधात उठलेला नाही तो जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याविरोधातही उठला होता. राम मनोहर लोहिया यांनी या आवाजाचा पाया रचला आणि जयप्रकाश नारायण यांनी तो बुलंद केला… इंदिरा बाईंनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरोधात रणशिंग बिहारच्या मातीने फुंकले. ही माती प्रस्तापितांविरोधात बंडखोरी करणारी आहे. अंधेरे मे एक प्रकाश…जयप्रकाश जयप्रकाश, या नार्‍याने सारा देश इंदिरा गांधींविरोधात रान पेटवले. रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी जातपात फेकून देत शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांची होळी करत रान पेटवले आणि यातून देश पेटून उठला. इंदिराबाईंना सत्तेवरून पायउतार केले. महाराष्ट्रातही सत्ता बदल झाला… क्रांती झाली! नितीश कुमार हे जयप्रकाश यांचे शिष्य आहेत. त्यांना सत्तेबरोबर समाजभान आहे. लोकसभा निकालात त्रिशंकू अवस्था झाली असती आणि एनडीएला बाहेरच्या पक्षांची मदत लागली असती तर या सर्व पक्षांना एकमेव चेहरा पटला असता तो म्हणजे नितीश यांचाच. लोकनेते जॉर्ज फर्नांडिस यांना महाराष्ट्राच्या मातीने घडवले, पण राजकीय अस्तित्व दिले ते बिहारने. बाहेरून आलेल्या माणसालाही बिहारी माणसांनी आपले म्हटले. या मातीतील भले माणसे गरीब असतील, पण घराघरात राजकीय भान आहे.

अस्मितेचे वारे आहे. मतदार जागृत आहे. निवडणुकीत जातीपाती आणि पैशांचा खेळ कुठे चालत नाही. गरिबीमुळे बिहारमध्ये तो प्रकर्षाने दिसतो इतकेच. फर्नांडीस यांच्या समता पार्टीने पडत्या काळात भाजपला साथ दिली होती. समाजवादी परिवार विरोधात जाऊनही आणि प्रचंड टीका सहन करूनही फर्नांडिस काँग्रेसविरोधात उभे राहिले… आज भाजप भले मोदी यांच्या कष्टांच्या आरत्या ओवाळत असेल, पण आज काँग्रेसबिगर सरकार देशात उभे आहे त्याची बिजे बिहारच्या मातीने रुजवली आहेत… जगातील मोठी लोकशाही भविष्यात जगली पाहिजे यासाठी काँग्रेस सारख्या विरोधी पक्षाचा नव उदय तर झाला पाहिजे, पण प्रादेशिक पक्षही टिकले पाहिजे आणि ते नितीश यांच्या स्वतंत्र बाण्याने दाखवून दिले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नितीश यांचे अभिनंदन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -