घरठाणेकल्याण डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ३६० कोटी मंजूर; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना...

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ३६० कोटी मंजूर; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

Subscribe

शहरातील वाहतूक अधिक वेगवान होईल, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यांवर हमखास खड्डे पडतात. त्या खड्ड्यांमुळे अपघात होतात तसेच वाहतुकीची कोंडी होत असते. कल्याण डोंबिवलीतील एकूण ३१ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. एमएमआरडीएने या रस्त्यांच्या कामासाठी तब्बल ३६०.६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे खड्डेमय होणाऱ्या रस्त्यांच्या दुष्टचक्रातून कल्याण डोंबिवलीकरांची कायमची सुटका होणार आहे .

केडीएमसीची आर्थिक अवस्था आधीच बिकट आहे. त्यामुळे नवीन विकास कामे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. यापूर्वी एमएमआरडीएकडून ठाण्यापलिकडील शहरांना विकास कामासाठी फारसा निधी मिळत नव्हता. कारण येथील लोकप्रतिनिधींना विकासासाठी कधीही एमएमआरडीएकडून निधी खेचून आणताच आला नाही. त्यामुळे या परिसरात विकासाचा मोठा बॅकलॉग  शिल्लक राहिला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री झाल्यानंतर ठाण्यापलिकडील शहरांच्या विकासासाठी एमएमआरडीएने आपली तिजोरी उघडल्याचे दिसून येते. त्यामुळेच कल्याण, शिळ रोड, ऐरोली लिंक रोड, कल्याण डोंबिवली रिंग रोड, डोंबिवली मोठागाव-माणकोली भिवंडी आदी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.

- Advertisement -

यापूर्वी डोंबिवली एम.आय.डी.सी. निवासी विभागातील रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने ११०.३० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. कल्याण डोंबिवलीतील बहुतांश रस्ते डांबरी असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात त्या रस्त्यांवर खड्डे पडतात. अपघात होतात व वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी  एमएमआरडीएने निधी द्यावा, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने मागणी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे माजी आयुक्त आर. ए. राजीव व  विद्यमान आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्या सोबत अनेक बैठका घेत पाठपुरावा केला. त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

ही होणार कामे

यामध्ये प्रामुख्याने ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उन्नत मार्ग बांधणे व १५ मी रस्ता विकसित करणेकरिता (उड्डाणपूल) २०.०० कोटी, डोंबिवली पूर्व मानपाडा रस्ता (स्टार कॉलनी) ते समर्थ चौक रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३४.५६ कोटी, आडिवली मलंगगड रोड ते आडिवली तलावापर्यंतच्या रस्त्यासाठी २१.३७ कोटी, कल्याण पूर्व (मलंगगड रोड – आरटीओ ऑफिस) ते म्हसोबा चौक ते माणेरे कमान रस्त्यासाठी १०.०० कोटी, व्हीनस चौक ते एस.एस.टी. कॉलेज – मोरयानागरी ते नागकन्या मंदिर – विटीसी ग्राउंड ते श्रीराम चौक पर्यंत व अंतर्गत रस्ते सी.सी. करण्यासाठी १७.००, शीळ रस्ता ते संदप-उसरघर रस्ता काँक्रिटीकरणासाठी १६.५६ कोटी, डोंबिवली पूर्व गजानन चौक ते (नांदिवली) नालापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी १४.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

इतर रस्त्यांची कामे

कल्याण डोंबिवलीतील अन्य रस्त्यांसाठी म्हणजेच डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी ८७.१३ कोटी, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी १११.९३ कोटी, कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी  १२३.५९ कोटी व  कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी ३७.९६ कोटी असा एकूण तब्बल ३६०.६४ कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएने खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केला आहे. या भरीव निधीमुळे कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, अस्तित्वातील डीपी रस्त्यांचा विकास व  दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. ही विकासकामे एमएमआरडीए प्रशासन स्वतः करणार आहे . त्यामुळे या शहरातील वाहतूक अधिक वेगवान होईल, असा विश्वासही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारी; पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -