घरताज्या घडामोडीसंपत्तीची हाव म्हणून चौघांनी साधला डाव

संपत्तीची हाव म्हणून चौघांनी साधला डाव

Subscribe

तानाजीला झिंग चढताच त्याच्या दारूच्या ग्लासात मंगेशने सोबत आणलेले विषाची बॉटल रिकामी केली, विष मिश्रित दारूचा प्याला घशाखाली उतरताच तानाजी गडबडा लोळू लागला. संतोषने बाजूला पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि तानाजीच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. काही वेळातच तानाजी शांत झाला. दोघांनी त्याचा मृतदेह एका खड्ड्यात टाकून तेथून पोबारा केला.

ठाण्यातील घोडबंदर रोड, येथील नागला बंदर या ठिकाणी मागील दहा ते बारा वर्षांपासून राहणारे तानाजी जावीर (४७) हे १७ जुलै पासून अचानक बेपत्ता झाले होते. तानाजी जावीर याचा मोबाईल फोन देखील बंद लागत होता, तानाजी कुठेच थांगपत्ता लागत नसल्यामुळे लहान भावाने ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. कासारवडवली पोलीसांचा शोध सुरू असताना तानाजीचा भाऊ सतत येऊन भावासाठी चौकशी करीत होता.

कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना तानाजी जावीर याच्या अचानक बेपत्ता होण्यामागे घातपाताची शक्यता तर नाही असा संशय आला. वपोनि. खैरनार यांनी घातपाताच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी विशेष तपास तयार केले. या पथकात पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, जयराज रणावरे, सपोनि सागर जाधव, पो.उ.नि. कुलदीप मोरे आणि त्यांचे पथक होते. या पथकाला वपोनि. खैरनार स्वतः मार्गदर्शन करीत होते. तपास पथक कामाला लागले तानाजी जावीर राहत असलेल्या नागला बंदर या ठिकाणी चौकशी सुरु केली.

- Advertisement -

तानाजी जावीर हा मूळचा मुंबईतील मालाड येथे राहण्यास होता, त्याच्यावर मालाड परिसरात एक हत्येचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. जामिनावर बाहेर येताच तानाजीने मुंबई सोडली आणि १२वर्षांपूर्वी तो ठाण्यातील नागला बंदर येथे राहण्यास आला होता. नागला बंदर येथे राहणार्‍या कल्पना नागलकर (४३)यांच्याकडे तो कामाला लागला. कल्पना नागलकर यांची नागला बंदर येथे अनेक चाळी होत्या. त्या चाळीतील खोल्या त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेल्या होत्या. या खोल्यांचे भाडे आणणे, हिशोब ठेवणे ही जबाबदारी तानाजी याच्यावर सोपवण्यात आली होती. कल्पनाचे पती वृद्ध असल्यामुळे तसेच त्यांना स्मृतिभ्रंशचा आजार असल्यामुळे तानाजी सर्व व्यवहार सांभाळता सांभाळता कल्पनाच्या अगदी जवळ आला होता. त्यातच एकेदिवशी कल्पनाच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण व्यवहार तानाजी बघू लागला होता. कल्पना हिची संपत्ती बघून तानाजीचा डोळा कल्पनाच्या संपत्तीवर पडला होता.

ही माहिती तपास पथकाच्या हाती लागली होती. तानाजी बेपत्ता होण्यामागे कल्पनाचा काही हात आहे का याचा तपास सुरू असताना त्याच परिसरात राहणारा संतोष घुंगरे हा तपास पथकाच्या रडारवर आला होता. पोलीस आपल्याला शोधत असल्याचे कळताच संतोष घुंगरे हा अचानक गायब झाला. पोलिसांनी त्याला फोन करून पोलीस ठाण्यात येण्यासाठी सांगितले असता मी सोलापूर येथे असल्याचे सांगून पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याच्या अशा वागण्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला. तपास पथकाने संतोष घुंगरे याच्या मोबाईलवरून त्याचा थांगपत्ता शोधला असता घुंगरे हा सोलापूरमध्ये नसून ठाणे जिल्ह्यातच असल्याची माहिती मिळाली होती. अखेर २४ऑक्टोबर रोजी संतोष घुंगरेला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे चौकशी सुरू केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.

- Advertisement -

तानाजी जावीर याची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. संतोष याने मित्र मंगेश मुरुडकर याच्या मदतीने तानाजीला दारूमध्ये विष टाकून त्यानंतर डोक्यात रॉडने प्रहार करून हत्या केल्याची कबुली दिली.या हत्येसाठी संतोष घुंगरे आणि मंगेश या दोघांना पैसे देण्यात आले होते, अशी माहिती संतोषने पोलिसांना दिली.संतोष आणि मंगेश या दोघांना गीता आरोलकर हिच्यामार्फत कल्पना नागलकर हिने तानाजीला संपवण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे संतोषने आपल्या कबुली जबाबात सांगितले.

पतीच्या मृत्यूनंतर कल्पनाला तानाजी त्रास देत होता. तिच्याकडे सतत पैशांची मागणी करून काही संपत्ती त्याच्या नावावर करण्यासाठी दबाब टाकत होता. अखेर तानाजीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे कल्पनाने ठरवले होते. कल्पनाकडे नेहमी येणारी जोगतीन गीता आरोळकर हिच्याकडे आपली व्यथा मांडली. तानाजीचा बंदोबस्त करण्यासाठी कोणी असेल तर सांग, असे कल्पनाने गीताला सांगितले.

माझा भाचा आहे त्यालाच सांगू तानाजीचा काटा काढण्यासाठी, असे गीताने कल्पनाला सांगितले. तानाजीचा काटा काढण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी ठरली. कल्पनाने १लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून गीताला दिली होती. गीताने या कामासाठी संतोष घुंगरे याला तयार केले व त्यातील काही रक्कम संतोषला दिली. काही कामधंदा न करणार्‍या संतोषने मित्र मंगेश मुरुडकर याची मदत घेण्याचे ठरवून त्याला या कामासाठी तयार केले. मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा मंगेश हा या कामासाठी तयार झाला. या दोघांनी योजना आखून तानाजीला दारू पिण्यासाठी बोलावून त्याला संपवायचा असा कट आखला.

१७ जुलै रोजी रात्री संतोष आणि मंगेश या दोघांनी तानाजीला दारू पिण्यासाठी गायमुख खाडी या ठिकाणी बोलावून घेतले. लॉकडाऊन असल्यामुळे परिसरात वर्दळ कमी होती. तिघेही खाडीजवळ एका झाडाखाली दारू पीत बसले होते. तानाजीला दारूची झिंग चढताच मंगेशने सोबत आणलेले डास मारण्याचे विषारी औषध तानाजीच्या ग्लासमध्ये ओतले. नशेत असल्यामुळे तानाजीला काही जाणवले नाही. विष मिश्रित दारूचा ग्लास तानाजीच्या घशाखाली उतरताच त्याच्या छातीत जळजळ होऊ लागली आणि तो जमिनीवर लोळू लागताच संतोषने शेजारीच पडलेल्या लोखंडी रॉडने तानाजीच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. वर्मी घाव बसताच तानाजीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या दोघांनी तानाजीचा मृतदेह जवळच असलेल्या खड्ड्यात टाकून तेथून पळ काढला. संतोषने दिलेल्या जबाबावरून कासारवडवली पोलिसांनी मंगेश मुरुडकर, गीता आरोलकर आणि कल्पना नागलकर या तिघांना ताब्यात घेऊन या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली.

कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तानाजीचा मृतदेह जिकडे फेकला होता तेथून मानवी हाडे, कवटी आणि कपडे ताब्यात घेतले असून ते फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -