घरताज्या घडामोडीमुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच भुयारी मार्गात विक्रेत्यांचे बस्तान

मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच भुयारी मार्गात विक्रेत्यांचे बस्तान

Subscribe

निष्क्रीय महामार्ग बांधकाम विभागामुळे महामार्गालगत प्रत्येकजण मनमानी करीत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही तोच शहराजवळ असलेले भुयारी मार्ग फेरीवाल्यांनी व्यापले असल्यामुळे भविष्यात भुयारी मार्गातून वाहन चालविताना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. भुयारी मार्ग आताच मोकळे केले नाही तर भविष्यात येथील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. शहराजवळ नाते खिंड आणि चांभार खिंड या ठिकाणी दोन मोठे भुयारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण असून, नाते खिंड ते विसावा हॉटेलपर्यंत उंची वाढवून महामार्गाचे काम सुरू आहे. नाते खिंड या ठिकाणी किल्ले रायगडकडे आणि शहरात जाण्यासाठी, तर चांभार खिंडीजवळ शहरातील प्रवेश मार्ग आहे. या दोन्ही ठिकाणी वाहनांची कायम वर्दळ असते. एसटी बस स्थानकात येणार्‍या बसेस देखील चांभार खिंड येथील भुयारी मार्गाचाच वापर करणार आहेत. सध्या एसटी महामंडळाच्या रस्त्यावरून शहरातील प्रवेश मार्ग आहे.

खाद्यपदार्थ, भाजी आणि फळ विक्रेत्यांनी या दोन्ही भुयारी मार्गात कब्जा केला आहे. यामुळे वाहन सर्व्हिस रस्त्यावर नेताना आणि सर्व्हिस रस्त्यावरून भुयारी मार्गात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी होत आहे. एका बाजूला विक्रेते, तर दुसर्‍या बाजूला रिक्षा उभ्या राहत असल्याने या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एसटी रस्त्याच्या प्रवेशद्वारावर विक्रेत्यांनी टपर्‍या टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे मासळी विक्रेत्या देखील रस्त्यावरच बसत आहेत. मासळी खरेदीला येणारे आपली वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावर लावतात. खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने याच रस्त्यावर खुलेआम प्रवाशांना गोळा करीत आसतात.

- Advertisement -

हीच अवस्था नाते खिंड येथील महाड-रायगड मार्गावर झाली आहे. या ठिकाणी देखील भुयारी मार्गात दोन्ही बाजूला आरडाओरड करणारे भाजी, फळे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. किल्ले रायगडकडे जाणार्‍या वाहनांना आणि तेथून शहरात येणार्‍या वाहनांना याचा त्रास होत आहे. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या कामासाठी आलेल्या वाहनांना देखील सामान उतरविताना अडचण निर्माण झाली आहे. महामार्ग पूर्ण होण्याआधीच या ठिकाणी फेरीवाले, विक्रेत्यांनी बस्तान बसविल्याने भविष्यात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

निष्क्रीय महामार्ग बांधकाम विभागामुळे महामार्गालगत प्रत्येकजण मनमानी करीत आहे. स्टील, लादी विक्रेत्यांनी सर्व्हिस रस्त्याच्या लगत असलेल्या गटारावरून मातीचा भराव करत अवजड वाहने आत नेण्यासाठी मार्ग केले आहेत. याकरिता महामार्ग बांधकाम विभागाची परवानगी आवश्यक असताना देखील कोणीही अद्याप परवानगी घेतलेली नाही. महामार्ग पूर्ण होत नाही तोच भुयारी मार्गात विक्रेते आपली दुकाने कशी थाटतात, याचे आश्चर्य सामान्य माणसाला आहे. घरासाठी काम करताना अडचण निर्माण करणारा महामार्ग बांधकाम विभाग मोठ्या दुकानदारांवर आणि विक्रेत्यांवर मेहरबान का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस उप विभागीय अधिकारी नीलेश तांबे यांनी दोन दिवसांपूर्वी नाते खिंड येथे जाऊन गणेशोत्सव काळात दुकाने काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

– निलेश पवार


हे ही वाचा – Money Laundering Case: अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -