नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नाही; आरोपी सावत्र भाऊ फरार

प्रॉपर्टीच्या वादातून सावत्र भावाने आपल्या भावाचा खून केला.

Thane Corporator Son Rakesh Manik Patil
डावीकडे मृत राकेश पाटील तर उजवीकडे आरोपी सावत्र भाऊ सचिन पाटील

शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील याचा मृतदेह अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राकेशची हत्या करून फरार झालेला सावत्र भाऊ सचिन पाटील याच्या मागावर पोलीस असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांचा ३४ वर्षाचा मुलगा राकेश पाटील यांची २१ सप्टेंबर रोजी सावत्र भाऊ सचिन पाटीलने माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंहच्या मदतीने गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर राकेश याचा मृतदेह गोणीत भरून वाशी पुलावरून खाडीत फेकून देण्यात आला.

खरी बातमी इथे वाचा – शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची सावत्र भावाकडून गोळ्या झाडून हत्या

बुधवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह याला अटक केली. या घटनेनंतर सावत्र भाऊ सचिन पाटील हा फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर असून लवकरच सचिन पाटील याला अटक करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली. तसेच माणिक पाटील यांच्या बंगल्यातून साडेतीन किलो सोन्याचे दागिने गायब झाले असून हे दागिने सचिन पाटील याने चोरी केले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान वाशी खाडीत फेकण्यात आलेला राकेशचा मृतदेह अद्याप मिळून आलेला नसून मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे खैरनार यांनी दिली आहे.