घरताज्या घडामोडीकोविड प्रमाणपत्र देता का हो? मोबाईल नसलेल्या वृद्धांची आर्त हाक

कोविड प्रमाणपत्र देता का हो? मोबाईल नसलेल्या वृद्धांची आर्त हाक

Subscribe

बर्‍याच जणांकडे मोबाईलची सुविधा नसल्याने आता प्रमाणपत्रांसाठी त्यांची पायपीट सुरू झाली

लॉकडाऊनमध्ये कोणी पायपीट करीत तर कधी एकत्रित पैसे गोळा करून खासगी वाहनाचा भुर्दंड सहन करीत गाववाड्यांमधील वृद्ध पुरुष-महिलांनी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणि पळचिल आरोग्य केंद्रात जाऊन कोविड लसीचे दोन डोस घेतले. मात्र यापैकी बर्‍याच जणांकडे मोबाईलची सुविधा नसल्याने आता प्रमाणपत्रांसाठी त्यांची पायपीट सुरू झाली असून, आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हे प्रमाणपत्र अद्याप त्यांच्यापासून दूर असल्याने नाराजीची भावना आहे.फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्रामीण रुग्णालयात तालुक्यासाठी प्रथम लसीकरण सुरू झाले.त्यावेळी शहरासह तालुक्यातील ८७ गावे आणि वाड्यांमधील वृद्धांनी लॉकडाऊन असल्यामुळे पायपीट करीत, तसेच खासगी वाहनांतून रुग्णालय गाठत भल्या पहाटेपासून रांगा लावल्या. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या दुर्गम भागातील पळचिळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे दोन डोस पूर्ण केले. मात्र शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतरही डोस घेतलेल्या वृद्धांना अद्याप संबंधित यंत्रणांकडून प्रमाणपत्र देण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे.

कोविड प्रमाणपत्र घरपोच देण्याची मागणी

उपलब्ध माहितीनुसार, या डोंगराळ तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातही ७० टक्के जनतेकडे स्मार्टफोन नाही. त्यात वृद्धांकडे स्मार्टफोन असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे पुन्हा शासकीय रुगणालय आणि पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारण्याची वेळ संबंधित अधिकार्‍यांनी जनतेवर आणलेली आहे. हे प्रमाणपत्र घरपोच देण्याची मागणी आता वृद्ध करू लागले आहेत. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांच्याशी संपर्क झाला नाही. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी जेथे लस घेतली तेथे गेल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल असे स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, धामणदेवी उप केंद्रात समुदाय अधिकार्‍याची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. तसेच लसीकरण करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला तालुका आरोग्य विभागाने धामणदेवी उप केंद्रात बाह्य रुग्ण विभाग आणि कोविड लसीकरण सुरू न करता हरताळ फासण्याचेच काम केले असल्याचे बोलले जात आहे.

                                                                             वार्ताहर- बबन शेलार

हे ही वाचा – Rain Update: मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; राज्यात आगामी दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा धोका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -