घरठाणेशहापुरात हरितकार्याला वेग येणार; इस्त्राईलच्या वाणिज्य दूतांचा शहापुरात दौरा

शहापुरात हरितकार्याला वेग येणार; इस्त्राईलच्या वाणिज्य दूतांचा शहापुरात दौरा

Subscribe

भारतातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून आटगावला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करून वाणिज्य दूत  कोबी शोशानी यांनी दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने हरित क्रांती घडवु शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पावसाचे नगण्य प्रमाण असताना कृषी क्षेत्रात चमत्कार करणाऱ्या इस्त्राईल देशातील शेती आता शहापुरात होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. इस्त्राईल आणि भारत यांच्या एकत्रित प्रयत्नांतून तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने इस्त्राईल ग्रामविकासाच्या संकल्पना राबवून येथे कृषिविकास साधता येईल का याची चाचपणी इस्त्राईलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी बुधवारी शहापुरात केली. परस्परांच्या सहकार्याने याठिकाणी नक्कीच काहीतरी चांगले उभे करता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्याच आठवड्यात मुंबईतील वाणिज्य दूत म्हणून पदभार स्वीकारलेले कोबी शोशानी यांनी नुकताच शहापुरचा दौरा केला. आवरे, आटगाव, कानविंदे, दहिगाव, टेंभा  आदी ठिकाणी भेट देऊन शेतीविषयक माहिती जाणून घेतली. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गाने सर्वत्र हिरवी दुलई पांघरलेली पाहून शहापुरच्या दौऱ्यात कोबी शोशानी यांनी आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

तालुक्यातील आवरे येथील शेतकऱ्यांनी लावलेल्या भात पिकांची माहिती तसेच तेथून जाणाऱ्या भातसा कालव्याबाबतही सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. याठिकाणी शेतमजूरांची उपलब्धता तसेच वीज आणि पाण्याबाबत काय व कशी व्यवस्था आहे. याबाबत विचारपूस केली. आवरे येथील महिलांशी संवाद साधला असता मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण जवळ असताना वर्षातले काही महिने आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची व्यथा यावेळी महिलांनी व्यक्त केली.

आटगाव येथील बाळा गोंदले या शेतकऱ्याने लावलेल्या भातशेतीची सखोल विचारपूस करून त्याबाबत माहिती जाणून घेतली. तर भारतातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून आटगावला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करून वाणिज्य दूत  कोबी शोशानी यांनी दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने हरित क्रांती घडवु शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यात कोबी शोशानी यांच्या सोबत आंतरराष्ट्रीय विकासात्मक क्षेत्रातील अधिकारी मिशेल जोसेफ यांसह  अनुवादक अनय जोगळेकर,  ठाणे जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, कृषी सभापती संजय निमसे, शहापुरचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, कृषी अधिकारी विलास झुंझारराव, ग्रामविकास अधिकारी संजय सावंत आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ४० अतिरिक्त विशेष ट्रेन, वाचा आरक्षणाची तारीख


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -