घरताज्या घडामोडीMahad : वांद्रे कोंडला पक्का रस्ता नाही ; ग्रामस्थांचे स्थलांतर

Mahad : वांद्रे कोंडला पक्का रस्ता नाही ; ग्रामस्थांचे स्थलांतर

Subscribe

महाड तालुक्यातील अनेक वाड्या आजदेखील मूलभूत सुविधांपासून वंचित असून, दासगाव गावाची वांद्रे कोंड ही वाडी देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिली आहे. ना रस्ता, ना धड पिण्याच्या पाण्याची सुविधा, यामुळे अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणाहून स्थलांतर करीत दासगाव गाठले आहे.

ऐतिहासिक तालुका असला तरी आज देखील विकासापासून वंचित राहिला आहे. अनेक प्रकल्प प्रलंबित राहिल्याने ग्रामीण, दुर्गम भाग कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे. यातीलच एक म्हणजे दासगाव गावाची वांद्रे कोंड वाडी. रस्ता नसल्याने अखेर निम्म्याहून अधिक घरे बंद राहिली आणि मुलांच्या शिक्षणासाठी शहराची वाट धरली. मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव आहे. मात्र या गावाची वाडी जवळच्या उंच डोंगरावर वसली आहे. जंगलात वसलेल्या या वाडीवर जाण्यासाठी आज देखील कच्चा रस्ताच आहे. ऐन पावसाळ्यात मात्र हा रस्ता बंद होतो आणि पायी चालत जाण्याची पाळी येथील ग्रामस्थांना येते.

- Advertisement -

राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे हा रस्ता रखडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी अनेक वर्षे पायपीट केली. मात्र काळाच्या ओघात मुलांचे शिक्षण आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अखेर येथील तरुणांना शहराची वाट धरावी लागली. हक्काच्या घराला कुलूप लावून घरे बंद करण्याची पाळी दासगाव वांद्रे कोंड ग्रामस्थांवर आली. या वाडीवर जवळपास ६० घरे आहेत. यातील फक्त १७ घरांमध्ये ग्रामस्थ वास्तव्याला आहेत. उर्वरित ग्रामस्थांनी दासगाव, जाधववाडी, नाते, कोंझर यांसह इतर गावात स्थलांतर करत घरे बांधली आहेत. नोकरीनिमित्ताने मुंबईसारख्या मोठ्या शहरातून तरुणांनी आपली कुटुंबे हलवली आहेत. दासगाव गावापासून ५ किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे.

उंच डोंगरावर जाण्यासाठी सन २००८ -२००९ मध्ये खासदार एकनाथ ठाकूर यांच्या निधीतून कच्चा रस्ता करण्यात आला आहे. याकरिता जवळपास १० लक्ष निधी मंजूर करण्यात आला होता. हा कच्चा रस्ता तयार केल्यानंतर आजतागायत या रस्त्यावर कोणताच निधी न पडल्याने ना पक्का रस्ता तयार झाला नाही. या ५ किलोमीटरसाठी डोंगर चढून जाण्यासाठी ग्रामस्थांना एक तासाची पायपीट करावी लागत आहे. भर उन्हात किंवा पावसाळ्यात वांद्रे कोंड ग्रामस्थांच्या नशिबी आलेले चालण्याचे दु:ख आज देखील संपलेले नाही.

- Advertisement -

रस्ता नसल्याने विद्यार्थी शाळेकरिता दासगाव आणि महाडसाठी पायी चालत येत होते. शिक्षणासाठी ऐन पावसाळ्यात हा मोठा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी अन्य गावात राहणे पसंत केले. यामुळे प्राथमिक शाळेला पट नसल्याने अखेर ही शाळा देखील बंद झाली. तर माध्यमिक शाळेला जाणारी मुले शहरात किंवा अन्य गावात गेल्याने आज एकही विद्यार्थी या गावात आढळणार नाही. शिक्षणाप्रमाणे शेतीची देखील वाताहत झाली आहे. पिढ्यान्पिढ्या केली जाणारी शेती स्थलांतरामुळे ठप्प झाली आहे. प्रत्येकाकडे किमान ५ खंडी भात पीक निघत होते. आज शेती करणारी पिढी शहरात गेल्याने शेती देखील ओसाड पडली आहे.

रस्त्यावर दरवर्षी डागडुजीवर खर्च केला जातो, मात्र पक्का रस्ता होत नसल्याने पोटासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी निम्म्याहून अधिक लोकांनी वाडी सोडली आहे.
– अनिल वांद्रे, सदस्य, दासगाव ग्रामपंचायत

दासगाव वांद्रेकोंड येथे कच्चा रस्ता तयार केला आहे. आमदार भरत गोगावले यांनी देखील शासकीय निधीची वाट न पाहता यंत्रणा वापरत रस्ता दुरुस्ती केला आहे. पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागतो. यामुळे नोकरी, शिक्षणासाठी बहुतांश ग्रामस्थांनी गाव सोडले आहे.
– दिलीप उकिर्डे, सरपंच दासगाव

 

                                                                                      वार्ताहर : निलेश पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -