मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते नवी मुंबईत ३ मनसे शाखांचे भव्य उद्घाटन

mns leader amit thackeray inaugurates three mns branch in navi mumbai
मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते नवी मुंबईत ३ मनसे शाखांचे भव्य उद्घाटन

मनसेच्या “शिवजनसंपर्क अभियानाचे” औचित्य साधून आज मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नेरूळ, जुईनगर आणि घणसोली विभागातील तीन शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी सामाजिक उपक्रम आणि संकल्प स्वीकारून मनसेने अनोखे उपक्रम राबविले असल्याचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. यावेळी वृक्षरोपण आणि त्या वृक्षांना दत्तक घेणे, वाचनालयाला पुस्तके भेट देणे आणि महिला सफाई कामगारांना रेशन कीट देणे असे निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर मनसेमय केला होता. महाराष्ट्र सैनिकांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी मनसे नेते अमित ठाकरेंसोबत छायाचित्र आणि सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

नेरूळ येथील मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी २५ झाडांचे वृक्षरोपण करून या सर्व वृक्षांना मनसेच्या शाखेने दत्तक घेतले आहे. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वतः वृक्षरोपण केले आणि या अभिनव उपक्रमाचे कौतुक वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आशिया खंडातील सर्वात छोटी गिर्यारोहक श्रविका म्हात्रे हिला देखील सन्मानित करण्यात आले. जुईनगर येथील मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबईतील कुसुमाग्रज वाचनालयाला पुस्तकांचा संच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. घणसोली येथील मनसेच्या रस्ते आस्थापना आणि साधन सुविधा विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी विभागातील महिला सफाई कामगार यांना एक महिन्याचे रेशन कीट मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवापासून नवी मुंबई शहरात १९ फेब्रुवारी ते ०२ मार्च या कालावधीत मनसे आयोजित “शिवजनसंपर्क अभियानाला” सुरुवात झाली आहे. या शिवजनसंपर्क अभियाना अंतर्गत नवी मुंबईकरांशी थेट भेटून संवाद साधणार असल्याचे आणि या संवादातून नवी मुंबईकरांच्या शहर विकासाबाबत विचार, सूचना व दृष्टिकोन जाणून घेणार असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले. या भेटींमध्ये नवी मुंबई शहरातील महिला भगिनी, विविध बचत गट, तरुण युवक मंडळे, पर्यावरणप्रेमी, डॉक्टर, अधीवक्ते, वास्तूविशारद, अभियंते, तसेच कला क्षेत्रातील मंडळी, कामगार वर्ग, तसेच बुद्धिजीवी लोकांचा समावेश असल्याचे आणि त्यांचे शहर विकासाबाबत संकल्पना, विचार व दृष्टिकोन जाणून घेणार असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले. नवी मुंबईकरांनी मनसेच्या या “शिवजनसंपर्क अभियानात” मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.


हेही वाचा – Raj Thackeray: भाजप नेते मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात?