उरण तालुक्यात ७१५ घरांचे पंचनामे

अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Punchnama of 715 damaged houses in Uran taluka
उरण तालुक्यात ७१५ घरांचे पंचनामे

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरण तालुक्यातही १९ जुलै रोजी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पूरजनक परिस्थिती निर्माण झाली. मागील आठवड्यात १९ जुलै रोजी मुसळधार पावसाने उरणला झोडपले होते. त्यामुळे उरण तालुक्यातील पूरपरिस्थितीचे पंचनामे उरण तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले. दरम्यान, उरण तालुक्यातील ७१५ घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामधील चिरनेर गावात तब्बल ३६९ कुटुंबांना पुराचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. या पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. त्यामुळे पुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे तहसील कार्यलयाच्या अंतर्गत असणाऱ्या तलाठी कार्यालयांमार्फत करण्यात आले आहेत. तालुक्यातील एकूण ७१५ पुरग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली, यामुळे हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर शेकडो निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. आता अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरत आहे. दरम्यान उरणमधील चिरनेर गावाला सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे.चिरनेर मधील ३६९ घरामध्ये पाणी गेल्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या पुरात लोकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून अन्नधान्य आणि कपड्यांची नासाडी झाली आहे. यामध्ये विंधणे-१०,जासई-५७,वेशवी-३१,चिरले-४८,जसखार-१४९,सवरखार-३१,करळ-४,कोप्रोली-३,सोनारी-७,री-७,मुळेखंड-१,चाणजे-३,वशेणी-१,सारडे-१, असे एकूण ७१५ पंचनामे करण्यात आले आहेत.


हेही वाचा – पुराच्या पाण्यामुळे विंचू, सर्पदंश यांचे रुग्ण वाढण्याची शक्यता, आरोग्य पथकांची नेमणूक