school Reopen : सरकारी संमतीनंतरही रायगडचे पालक संभ्रमित ; विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्क्यांहून कमी

शाळांमधील सुरक्षा साधनांची खातरजमा केल्याविना पालक पाल्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.

school reopen : the number of student in raigadis less than 40
सरकारी संमतीनंतरही रायगडचे पालक संभ्रमित

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सोमवारी सुरू झाल्या असल्या तरी पालकांनी आपल्या पाल्ल्यांची काळजी वाहिल्याचे दिसून आले. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरू झालेल्या शाळांमधील सुरक्षा साधनांची खातरजमा केल्याविना पालक पाल्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. याचे प्रत्यंतर शाळा सुरू व्हायच्या पहिल्या दिवशीच आले. पहिल्याच दिवशी ४० टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांनी शाळेच्या घंटेला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसू लागताच राज्य सरकारने राज्यातील विविध ठिकाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून राज्यातील शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. या सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थी आवडीने येतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या सुरक्षेची प्रचंड काळजी पालकांनी घेतलेली पाहायला मिळाली. शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेतले खरे. तरीही पालक निर्धास्त नाहीत, हे पाहायला मिळाले. अनेक पालकांनी स्वत: शाळेत जाऊन तिथल्या सुरक्षा साधनांचा आढावा घेतला.

विशेषत: विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या निमित्ताने शाळा संस्थांनी काय तयारी केली, याची पडताळणी करूनही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत, असे पाहायला मिळाले. सोमवारच्या पहिल्या दिवशी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४० टक्क्यांहून कमी होती. यातच ज्या विद्यार्थ्यांनी पालकांचे संमतीपत्र आणले नाही, त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला गेला. एकूणच आपल्या पाल्याच्या सुरक्षेची खबरदारी पालकांनी घेतलेली पाहायला मिळाली.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केली. मात्र तरीही विद्यार्थ्यांची अपेक्षित उपस्थिती त्यांना मिळाली नाही. रायगड जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील स्थिती अशीच होती. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाचे सावट पूर्णत: संपलेले नाही. यामुळे आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांमध्ये दुमत पाहायला मिळत आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात अनेक पालकांकडून शासनाच्या या निर्णयाला काहीसा विरोध पाहायला मिळत आहे.


हे ही वाचा – Lakhimpur Violence : देश हुकूमशाहीत, परवानगी नाकारली तरी लखीमपूरला जाणार – राहुल गांधी