घरताज्या घडामोडी...तर नवी मुंबई विमानतळाचं कामकाज बंद पाडू ; मशाल मोर्चात सरकारला ईशारा

…तर नवी मुंबई विमानतळाचं कामकाज बंद पाडू ; मशाल मोर्चात सरकारला ईशारा

Subscribe

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी काढलेला मशाल मोर्चा हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे.

दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीच्या नावाने एक संघ होवून  नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देवू शकलो तरच आपल्या समाजाला न्याय देण्याची प्रक्रिया सूरू होईल, अन्यथा आपल्याला गृहित धरले जाईल. दिबांचे नाव या विमानतळास देण्यासाठी आमचा १५ ऑगस्टचा अल्टिमेटम आहे. तोवर निर्णय न झाल्यास विमानतळावर एकही काम होणार नाही, अशी भिष्म प्रतिज्ञा आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील जासई येथे केली.

दि.बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळालानाव देण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनाच्या निमित्ताने दि.बा. पाटील यांच्या जन्मगावी जासई येथे मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस दशरथ पाटील बोलत होते. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी जासई येथून पेटवीलेली ही मशाल लोकांमध्ये प्रकाश पाडून हा नामांतरणाचा लढा यशस्वी करील असा विश्वास दशरथ पाटील यांनी व्यक्त केला. जासईच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील सभागृहात आयोजित या मशाल मोर्चात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. हुतात्मा स्मारकातून निघालेला हा मोर्चा सभास्थानी पोहोचला तेव्हा जोरदार घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात होते. दि.बा.पाटील ही आमच्या शेतकर्‍यांची अस्मिता आहे. या अस्मितेला कदापि विसरू शकत नाही. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला केवळ आणि केवळ दिबांचेच नाव शोभून दिसेल, ही तमाम शेतकर्‍यांची खात्री आहे, असे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

- Advertisement -

विमानतळाला दिबांच्या नावाशिवाय पर्याय नाही, असे जाहीर करत दशरथ पाटील यांनी आम्ही सरकारला आणखी एक संधी देतो. १५ ऑगस्टपर्यंत याबाबतचा निर्णय न झाल्यास पुढची सारी जबाबदारी ही सरकारची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर विमानतळावरील सारी कामे बंद पडतील, असे त्यांनी जाहीर केले. नवी मुंबईतील शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जसे प्रकल्पग्रस्तांच्या पाठी उभे राहिले तसेच दि.बा. पाटील यांच्या नामकरणासंदर्भात नामकरण कृती समितीच्या मागे उभे राहून दि.बा. पाटील यांचे विमानतळाला नाव  देण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन दशरथ पाटील यांनी केले.

दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावे, यासाठी ९ ऑगस्ट रोजी जासई येथे विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामोर्चासाठी रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाची सुरूवात जासईतील १९८४च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना  आणि दि.बा. पाटील यांना अभिवादन करून करून मशाल पेटविण्यात आली. या मशाल मोर्चावेळी वेगवेगळ्या भागात प्रकल्पग्रस्तांकडून मशाली नेण्यात आल्या.  यावेळी लाल सलाम, लाल सलाम दि. बा. पाटील लाल सलाम, अशा घोषणा देण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या गावात या मशाली नेवून जनजागृती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या मशाल मोर्चाला दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील. उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कॉ. भूषण पाटील, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, यांनी मार्गदर्शन केले.  या मोर्चावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक राजेंद्र पाटील, शेकापचे नेते रवीशेठ पाटील तसेच रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून या मशाल मोर्चाला शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात होता.


हेही वाचा – रोह्यात सापडला दुर्मिळ उडता सोनसर्प ; उरणच्या सर्पमित्रांकडून जीवदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -