Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचं निधन

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचं निधन

Related Story

- Advertisement -

ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांचं अल्पशा आजाराने सोमवारी दुपारी निधन झालं. वयाच्या ६७व्या वर्षी अनंत तरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सुन, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. अनंत तरेंवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अनंत तरे यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होती. पण आज (सोमवारी) पावणे पाचच्या सुमारास त्यांचं निधन झालं. १९९२ रोजी अनंत तरे राबोडीतून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ३१ मार्च १९९३ साली ते पहिल्यांदाच ठाणे महापालिकेच्या महापौर पदी विराजमान झाले. मग १९९४-९५ साली सलग तीनवेळा महापौरपद भूषवलं. सलग तीनवेळा ठाण्यातील महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांनी केला आहे. १९९७ साली तरे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावर नियुक्ती झाली. मग २००० साली त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली.

- Advertisement -

विधानपरिषदेच्या २००६च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव विजयी होऊन तरे पराभूत झाले होते. त्यानंतर विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली, त्यामुळे तरे नाराज झाले होते. मग त्यानंतर त्यांनी भाजप झेंडा हाती घेऊन कोपरी-पाचपांखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या घटेनच्या अवघ्या २४ तासांच्या आत त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि पुन्हा शिवसेनेचे धनुष्य हाती घेऊन भाजपकडची उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर अनंत तरे पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले.

शिवसेनेचा निष्ठावान अनंतात विलीन होऊन तारा झाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार अनंत तरे यांच्या निधनाबद्धल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, टशिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक अनंत तरे गेले , कोविड योद्धा अखेर कोविडने आपल्यातून हिरावून नेला , अनंत तरे म्हणजे ठाण्यातला सच्चा कार्यकर्त्ता. शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी द्यायची आणि अनंत तरे यानी ती निभावायची आणि त्याना सर्व कोळी समाजातील बांधवांनी , शिवसैनिकानी साथ द्यायची हे जणू ठरलेले समीकरणच . ठाण्याचे महापौर पद असो , एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष पद असो , लोकसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी असो की ठाण्यातील संघटनेचे कोणतेही काम असो ; अनंत तरे नेहमी पुढे , शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्त्ता आज अनंतात विलीन झाला आणि खरेच तारा म्हणून आकाशगंगेत सामावला. अनंता आता तुला कोण पाहू शकणार नाही पण तुझी स्मृती कायम आम्हा शिवसैनिकांच्या स्मरणात राहील, खरच अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा निखळला , त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.’ अशा दुःखद भावना व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे गरीब मध्यमवर्गीयांचे नुकसान


 

- Advertisement -