टपाल खात्याद्वारे धनवृद्धीची सुविधा

प्रातिनिधीक फोटो

सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच टपाल खात्याच्या इतर योजनाही गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगल्या आहेत. आपलं गुंतवणुकीचं उद्दिष्ट निश्चित करून निश्चित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये किमान काही रक्कम गुंतवण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या पार्श्वभूमीवर टपाल खात्याच्या काही योजना महत्त्वपूर्ण ठरतात. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीची एससीएसएसही चांगली ठरते. या योजनांचा आढावा.

आपल्या पोर्टफोलिओमधील काही रक्कम मुदत ठेवींमध्ये असणं चांगलं असल्याचं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. कारण, मुदत ठेवींमधून निश्चित रक्कम मिळण्याची हमी दिली जाते. बँकांच्या तुलनेत सध्या टपाल कार्यालयांकडे मुदत ठेवींचे दर किंचित जास्त असल्यानं अनेकजण तिकडे वळत आहे. विशेषतः टपाल कार्यालयाच्या कालबद्ध ठेवी या दृष्टीनं गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. टपाल कार्यालयं वैयक्तिक आणि संयुक्त (जॉइंट) खात्यांसाठी एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवी देऊ करतात. पाच वर्षांच्या कालबद्ध ठेवी या सेक्शन ८० सी अंतर्गत करलाभासाठी पात्र असतात. दर आर्थिक वर्षअखेरीला देऊ केलेल्या व्याजाच्या दराचा फेरआढावा घेतला जातो. या योजनेत गुंतवलेले पैसे परिपक्वतापूर्व काळात पैसे काढता येतात. मात्र त्यासाठी विशिष्ट दंड आकारला जातो. किमान २०० रुपये एवढी रक्कम या ठेवींमध्ये गुंतवणं शक्य असतं. त्यापुढील रक्कमही २०० च्या पटीतच असली पाहिजे. गुंतवणुकीच्या रकमेसाठी कमाल मर्यादा नाही. २०१७ -१८ या आर्थिक वर्षासाठी एक आणि दोन वर्षांच्या ठेवींसाठी अनुक्रमे ६.९ टक्के आणि ७ टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला असून तीन आणि पाच वर्षांच्या ठेवींसाठी तो अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.७० टक्के आहे. अर्थातच बँकांप्रमाणेच टपाल कार्यालयांमधील मुदत ठेवींवर मिळणारं व्याजही करमुक्त नसतं.

आवर्ती ठेवी (रिकरिंग डिपॉझिट्स किंवा आरडी) हा बाजारात उपलब्ध असलेला साधा गुंतवणूक पर्याय आहे. या ठेवी फारसे लक्षणीय परतावे देत नाहीत; परंतु एखादी व्यक्ती दीर्घ काळापर्यंत नियमितपणे प्रमाणशीर रक्कम गुंतवत राहिली तरी अखेरीस लक्षणीय रक्कम उभी करू शकते, हा मौल्यवान धडा त्या देतात. टपाल कार्यालयांमध्ये आवर्ती ठेवींसाठी पाच वर्षांचा निश्चित कालावधी आहे. या आवर्ती ठेवी संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित दरानं व्याज देऊ करतात. मुदतपूर्व किंवा परिपक्वतापूर्व काळात खातं बंद केलं तर टपाल कार्यालय तुमचा पैसा टपाल कार्यालयातील बचतींच्या दरानं (सहसा हा दर चार टक्क्यांहून कमी असतो) परत करतं. तुम्हाला बचतीतून एक चांगली रक्कम उभारायची असेल परंतु तुमच्याकडे मुदत ठेवीत किंवा तत्सम इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवण्याएवढी मोठी रक्कम नसेल तर आवर्ती ठेवींपासून सुरुवात करणं चांगलं असल्याचा सल्ला दिला जातो. टपाल कार्यालयांमध्ये अगदी १० रुपयांपासून ही ठेव ठेवता येते. कोणीही अशा प्रकारे आवर्ती ठेव खातं उघडू शकतं.एक जून २०१५ पासून हे व्याज दहा हजार रुपयांच्या पुढे जात असेल तर तुमच्या प्राप्तिकर स्लॅबनुसार मुदत ठेवींप्रमाणेच टीडीएस कापून घेतला जातो.

मध्यम ते दीर्घ मुदतीच्या जोखीममुक्त गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असाल तर राष्ट्रीय बचतपत्रांचा म्हणजेच नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्सचा (एनएससी)विचार करणं चांगलं ठरतं. ही सर्टिफिकेट्स चांगल्या दरानं परतावा देतात आणि सेक्शन ८० सी अंतर्गत त्यांच्यातील गुंतवणुकीवर करलाभही मिळतो. याखेरीज भारत सरकारकडून त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. शिवाय गुंतवणुकीसाठी अर्ज करून गुंतवणूक सुरू करण्याचा हा एक सर्वाधिक सोपा, सुलभ मार्ग आहे. एनएससीमध्ये विशिष्ट दरानं गुंतवणूक केली की त्या सर्टिफिकेटच्या संपूर्ण मुदतीअखेरपर्यंत तोच दर कायम राहतो. उदाहरणार्थ, तुम्ही मे २०१६ मध्ये ५ वर्षांसाठी एनएससीमध्ये गुंतवणूक केली असेल तर या गुंतवणुकीची मुदत संपेपर्यंत तुम्हाला ८.१० टक्के व्याजदरानेच (वार्षिक चक्रवाढीने) व्याज मिळत राहील. त्यानंतरच्या कालावधीत एनएससीचा व्याजदर चढला किंवा घसरला तरी तुमच्या या व्याजदरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पूर्वी गुंतवणूकदारांना १००, ५००, १,०००, ५,००० आणि १०,००० रुपयांची सर्टिफिकेट्स दिली जात असत. जुलै २०१६ पासून या सर्टिफिकेट्सऐवजी ई-पद्धतीने गुंतवणूक केली किंवा पासबुकमध्ये नोंदवली जाते. योजनेत किमान १०० रुपये गुंतवणूक करावी लागते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. एनएससीमध्ये केलेली दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक त्या आर्थिक वर्षात इतर पात्र गुंतवणुकी आणि खर्चांसह सेक्शन ८० सी अंतर्गत करलाभासाठी पात्र असते.

ही एकाच वेळी करावयाची गुंतवणूक असते. मृत्यू, कर्जापोटीची जप्ती किंवा न्यायालयीन आदेश यासारख्या टोकाच्या गंभीर स्थितींखेरीज एनएससींमधून परिपक्वतापूर्व काळात पैसे काढण्याची परवानगी मिळत नाही. ज्या लोकांना जोखीम घेण्याची इच्छा नसते आणि सरासरी परताव्याहून थोडा अधिक परतावा मिळाला तरी जे समाधानी असतात, त्यांच्यासाठी एनएससी हा आदर्श गुंतवणूक पर्याय आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचं हे चांगलं उत्पादन असून मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसारख्या विशिष्ट हेतूंसाठी निधी जमा करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. एनएससींमधील गुंतवणुकीवर दर वर्षी मिळवत असलेलं व्याज तुम्ही काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे तेही एनएससींमध्येच ठेव म्हणून ठेवलं जातं. अशा प्रकारे पुनर्गुंतवणूक करण्यात आलेलं हे व्याज म्हणजे नवीन गुंतवणूक असल्याचा दावा करून सेक्शन ८० सी अंतर्गत परिपक्वतेपूर्वीच्या आगामी आणखी चार वर्षांसाठीही करलाभ मिळवणं शक्य असतं. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी १५०० रुपये व्याज मिळालं असेल आणि दुसèया व तिसèया वर्षी अनुक्रमे १६०० आणि १७०० रुपये व्याज मिळालं; तसंच चौथ्या वर्षी १८०० रुपये व्याज मिळालं तर तुम्ही या रकमा संबंधित प्रत्येक आर्थिक वर्षात एनएससींमधील नवीन गुंतवणूक असल्याचं दाखवू शकता आणि सेक्शन ८० सी अंतर्गत करलाभाचा दावा करू शकता. आपल्या प्राप्तिकर परताव्यांचे अर्ज भरताना सेक्शन ८० सी अंतर्गत केलेली गुंतवणूक म्हणून ही रक्कम दाखवून तुम्ही कपातीचा दावा करू शकता. पाचव्या वर्षी मिळवलेलं व्याज मात्र गुंतवणूक म्हणून दाखवता येत नाही कारण पाचवं वर्ष संपल्यानंतर ते तुम्हाला दिलं जातं.

सरकारनं २००४ च्या ऑगस्टमध्ये सीनियर सिटीझन्स सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस म्हणजेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना) सुरू केली. ज्येष्ठ नागरिक या योजनेत एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकतात आणि त्रैमासिक व्याज मिळवू शकतात. परिपक्वतेनंतर मूळ रक्कम त्यांना परत दिली जाते. साठ वर्षं किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही निवासी भारतीय नागरिक एससीएसएसमध्ये गुंतवणूक करू शकतो. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारी (व्हीआरएस/स्पेशल व्हीआरएसअंतर्गत) आणि ५५ ते ६० वर्षांदरम्यान वय असलेली व्यक्ती एससीएसएसमध्ये गुंतवणूक करू शकते. निवृत्तीनंतर नियमित, स्थिर उत्पन्न ओघाच्या शोधात असलेले ज्येष्ठ नागरिक या पर्यायाचा विचार करू शकता. पीओएमआयएस, एनएससी, पीपीएफ इत्यादींच्या तुलनेत एससीएसएसमधील गुंतवणुकीत उच्चतर परतावे मिळवून देतात. या योजनेत १५ लाखांपर्यंत रक्कम गुंतवता येते.

 

महेश देशपांडे