घरक्राइमSalman Khan : सलमान खान घराजवळील गोळीबार प्रकरणी आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस...

Salman Khan : सलमान खान घराजवळील गोळीबार प्रकरणी आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

मुंबई : दोन दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन शूटरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी भूज येथून अटक केली. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही बिहारच्या चंपारणचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा तपासकामी गुन्हे शाखेचे पथक बिहार, गुजरात आणि इतर राज्यात जाणार असल्याचे सांगण्यात आले. सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Accused in police custody till April 25 in case of firing near Salman Khan house)

दोन दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराजवळ दोन बाईकस्वाराने पाच ते सहा गोळ्या फायर करुन पलायन केले होते. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या गुन्हे शाखेच्या युनिटकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या भूज शहरातून विकीकुमार आणि सागरकुमार या दोन्ही शूटरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.

- Advertisement -

आतापर्यंतच्या तपासात ते दोघेही सलमान खान याच्या घराजवळ आले होते. विकीकुमार बाईक चालवत होता तर सागरकुमारने गोळीबार केला होता, तसेच या गुन्ह्यांत लॉरेन्स बिष्णोईचे नाव समोर आले होते. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गोळीबारासाठी विदेशी पिस्तूलचा वापर झाला होता. मात्र गोळीबारानंतर त्यांनी ते पिस्तूल फेकून दिले होते. त्यामुळे ते पिस्तूल लवकरच जप्त केले जाणार असून त्याच पिस्तूलने गोळीबार झाला होता का? याची पाहणी केली जाईल.

हेही वाचा – Crime News : साडेतीन लाखांचे तीसहून अधिक चोरीचे मोबाईल हस्तगत; दोन सराईत आरोपींना अटक

- Advertisement -

दोन्ही आरोपी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला बिहारहून ट्रेनने मुुंबई सेंट्रलला आले होते. 29 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान त्यांनी बॅण्डस्टॅण्डसह सलमान खानच्या घराची रेकी केली होती. त्यानंतर ते दोघेही मुंबईहून पनवेलला गेले होते. तिथे त्यांनी भाड्याने एक फ्लॅट घेतला होता. दहा मार्चला त्यांच्या फ्लॅटचा भाडेकरार झाला होता. त्यासाठी त्यांनी त्यांचे आधारकार्ड दिले होते. हा फ्लॅट पनवेलच्या एका व्यक्तींच्या मालकीचा असून त्याला त्यांनी 13 हजार 500 रुपये दिले होते. 18 मार्चला ते दोघेही होळीसाठी बिहारला गेले आणि 28 मार्चला पुन्हा मुंबईत आले. यानंतर 2 एप्रिलला त्यांनी एक बाईक 24 हजार रुपयांमध्ये खरेदी केली. हा संपूर्ण व्यवहार कॅश स्वरुपात झाला होता. गोळीबारासाठी ते पुन्हा मुंबईत आले होते.

सलमान खानच्या घराजवळ गोळीबार केल्यानंतर ते दोघेही माऊंट मेरीजवळ गेले. तिथे बाईक सोडून ते दोघेही वांद्रे, सांताक्रुज आणि नंतर वाकोला येथे आले. नवी मुंबईतून ते दोघेही एका खाजगी कारमधून सुरतला गेले. सुरत शहरात आल्यानंतर ते राज्य परिवहन बसने अहमदाबादला आणि नंतर भूज असा प्रवास केला. दुसर्‍या दिवशी ते भूज येथील एका मंदिरात थांबले होते. या दोघांची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे एक विशेष पथक भूज येथे गेले. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

सागर पाल हा दोन वर्षांपूर्वी हरियाणा येथे नोकरी करत होता. तिथेच तो बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. विकीकुमार हादेखील तिथे कामाला होता. ते दोघेही एकाच गावचे रहिवाशी असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांना कोणालाही इजा घडवून आणायची नव्हती. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तसे आदेशच त्यांना देण्यात आले होते. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या दोघांची पाोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

या दोघांनी कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला होता. गोळीबार करण्याामागे त्यांचा काय उद्देश होता. गोळीबारानंतर त्यांनी पिस्तूल फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते पिस्तूल हस्तगत करणे बाकी आहे. गोळीबारानंतर सोशल मीडियावर गुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी स्विकारण्यात आी होती. ते अकाऊंट विदेशातून ऑपरेट झाले होते. त्याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने बिहारहून मुंबईत आले होते. त्यामुळे हा कट बिहारमध्ये शिजला होता का? या तपासासाठी मुंबई पोलिसांची एक टिम लवकरच बिहारला जाणार आहे.

गोळीबारानंतर दोन्ही आरोपी मुंबईतून गुजरातला पळून गेले होते. तिथेच जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता. तिथे त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का? याचाही तपास बाकी असल्याने गुजरातला एक टिम जाणार आहे. या कटात मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचे कोण सहकारी आहेत, त्यांना कोणी मदत केली याचा तपास सुरू आहे. गुन्ह्यांसाठी त्यांनी बाईक खरेदी केली होती. त्यासाठी त्यांना आर्थिक मदत कोणी केली. ते दोघेही मुंबई आणि पनवेल येथे काही दिवसांपासून वास्तव्यास होते. या कालावधीत ते कोणाला भेटले, ते कोणाच्या संपर्कात होते. सलमान खान वगळता त्यांना इतर कोणावर हल्ला करायचा होता का? त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का? याचा आता गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. दुसरीकडे आरोपीचे वकील अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, कलम 307 या गुन्ह्यांत अजिबात लागू होत नाही. कारण कोणत्याही पिडीत व्यक्तीला, तक्रारकर्त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. त्यांना या प्रकरणात खोटे गुंतविण्यात आले आहे. त्यांनी कधीही घटनास्थळाला भेट दिली नाही, असे त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -