घरक्राइममराठी तरुणीची ऑनलाईन फसवणूक; चोर म्हणतो माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कनेक्शन

मराठी तरुणीची ऑनलाईन फसवणूक; चोर म्हणतो माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कनेक्शन

Subscribe

दिवाळीचे दिवे ऑनलाईन विक्री करणार्‍या एका मराठी तरुणीची दिवे विकत घेण्याचा बहाणा करून एका लखोबा लोखंडेने आर्थिक फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता या लखोबाचा पोलीस शोध घेत आहेत. विकास पटेल या लखोबाने त्यानंतर या तरुणीला तू पोलिसात तक्रार केलीस तरी काही फरक पडणार नाही, आमची मोठी टोळी आहे, माझी नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख आहे, अशी धमकी दिली.

कोरोना महामारीमुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या, त्यामुळे दिवाळीत तरुण तरुणी दिवे तयार करुन त्यांची विक्री ऑनलाईन करताना दिसून येत आहेत. पण त्यांना ऑनलाईन फसवण्याचे प्रकार घडत आहेत. कल्याण पश्चिमकडे अशी एक घटना समोर आली आहे. दिवे खरेदी करण्याच्या बहाण्याने विकास पटेल या व्यक्तीने मराठी तरुणीची फसवणूक केली आहे. कल्याण पश्चिम येथे राहणार्‍या स्वागता आराख या तरुणीने दिवाळीत घरी दिवे तयार करत ऑनलाईन विक्री करण्यास सुरूवात केली. स्वागताने तिने बनवलेल्या दिव्यांचे फोटो फेसबुकवर विक्रीसाठी टाकले होते. ते फोटो बघून तिला विकास पटेलने फोन केला. आपण आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून स्वागताला २० दिव्यांची ऑर्डर त्याने दिली. स्वागताने ऑर्डर बुक करत कुरीअरने दिवे पाठविण्यासाठी पैसे आणि घराचा पत्ता मागितला. मात्र पैसे देत असताना त्याने गुगल पेवर स्वागताला ५ रुपये पाठविण्यास सांगितले. तेव्हा तिने पाच रुपये पाठविले. तेव्हा त्याने तिला १० रुपये फोन पे वरून परत केले. परंतु त्याच्या स्वाइप मशीनचा काहीसा प्रॉब्लेम आहे, असे बोलून त्याने तिच्याकडे ११०० रुपयांची मागणी केली आणि मी परत पाठवतो असेही बोलला. पुन्हा अजून थोडी फार अडचण सांगून त्याने तिच्याकडून तब्बल ८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर करून घेतले. नंतर स्वागताने आपल्या पूर्ण पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपीने स्वागताचे पैसे परत करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅनकॉर्डची मागणी केली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, आपली फसवणूक करण्यात येत आहे.

- Advertisement -

मोदींचे नाव घेऊन चोरट्याची मुजोरी

स्वागताने विकास पटेलला पैसे परत करण्याची विनंती केली, अन्यथा पोलिसांकडे तक्रार करावी लागेल असे सांगितले. त्यावर विकास पटेलने तिला सरळ शिवीगाळ करत सांगितले, मी तुला पुन्हा पैसे परत करणार नाही. तुला कुठे तक्रार करायची तिकडे कर, आमची खूप मोठी टोळी आहे, कोणी आमचे वाकडे करू शकणार नाही. मोदींशी माझी ओळख आहे. त्यानंतर स्वागताने कल्याण पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीचा नंबर आणि फोन रिकॉडिंग पोलिसांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती स्वागताची मोठी बहीण मानसी आरख यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

ऑनलॉईन व्यवहार करताना सावधान

सध्या सोशल मीडियावर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात आहेत. विकास पटेलसारखे बरेच आरोपी आहेत. सगळ्यांनी ऑनलॉईन व्यवहार करत असताना सावधानता बाळगावी. कोणाला आपला आधार कार्ड, पॅनकार्ड क्रमांक देऊ नये किंवा आपला ओटीपी क्रमांक देऊ नये अन्यथा आपलीही अशीच फसवणूक होऊ शकते, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -