मेघालय आणि नागालँडमधील 559 उमेदवारांपैकी 302 कोट्यधीश

नवी दिल्ली : मेघालय आणि नागालँडमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागांवर ही निवडणूक होत आहे. मेघालयात एकूण 375 उमेदवार रिंगणात आहेत, तर नागालँडमध्ये 184 उमेदवार रिंगणात आहेत. मेघालयातील 375 उमेदवारांपैकी 186 आणि नागालँडमधील 184 उमेदवारांपैकी 116 उमेदवार कोट्यधीश आहेत.

मेघालयात 85 उमेदवार असे आहेत की, ज्यांची संपत्ती 5 कोटी किंवा त्याहून अधिक आहे. 47 उमेदवारांकडे 2 ते 5 कोटी रुपये, 103 उमेदवारांकडे 50 लाख ते 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 10 ते 50 लाखांच्या दरम्यान संपत्ती असलेले 76 उमेदवार आहेत आणि 64 उमेदवारांची संपत्ती 10 लाखांपेक्षा कमी आहे. उमेदवारांची सरासरी मालमत्ता 5.91 कोटी रुपये आहे.

एनपीपीचे 43, यूडीपीचे 30, तृणमूल काँग्रेसचे 27, काँग्रेसचे 25, भाजपाचे 23, अपक्ष 17, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (एचएसपीडीपी) 08, व्हॉइस ऑफ द पीपल्स पार्टीचे 7, पीडीएफचे 3 उमेदवार कोट्यधीश आहेत. यूडीपीचे उमेदवार मेटबाह लिंगडोह यांची एकूण संपत्ती 146 कोटींहून अधिक आहे. मेटबाहकडे 87 कोटी रुपयांची जंगम आणि 58 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे व्हिन्सेंट हे मेघालयातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 125 कोटींहून अधिक आहे. त्याच्याकडे दोन कोटी 49 लाखांहून अधिक जंगम आणि 123 कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता आहे. हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार एव्हलिनी खरबानी या मेघालयातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवार आहेत. इव्हलिनी यांची एकूण संपत्ती 109 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिक जंगम आणि 94 कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता आहे.

नागालँडमध्ये 116 उमेदवार कोट्याधीश
नागालँडमध्ये 184 उमेदवारांपैकी 116 कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे सरासरी 5.13 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 5 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले 57 उमेदवार आहेत. 32 उमेदवारांकडे दोन ते पाच, तर 48 उमेदवारांकडे 50 लाख ते 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतची संपत्ती असलेले 27 उमेदवार आहेत. 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी संपत्ती असलेले 20 उमेदवार आहेत. त्यात एनडीपीपी 34, भाजपा 18, एनपीएफ 13, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) 12, एनसीपी 10, अपक्ष 8, एनपीपी 7, काँग्रेस 6, जेडीयू 4, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 3, आरजेडी 1 उमेदवाराचा समावेश आहे.

लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार डॉ. सुखातो ए. सेमा हे नागालँडमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. डॉ. सुखातो यांची एकूण संपत्ती 160 कोटींहून अधिक आहे. यामध्ये 11 कोटी 30 लाखांहून अधिक जंगम आणि 148 कोटींहून अधिक स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. एनडीपीपीचे नेते व नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांची एकूण संपत्ती 46 कोटींहून अधिक आहे. यामध्ये 15 कोटींहून अधिक जंगम आणि 30 कोटी 96 लाखांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. भाजपचे उमेदवार ई. काहुली सेमा हे नागालँडमधील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. कहुलीची एकूण संपत्ती 34 कोटींहून अधिक आहे. यामध्ये 52 लाख रुपयांपेक्षा जास्त जंगम आणि 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता आहे.