आमदार राजन साळवींची दुसर्‍यांदा एसीबी चौकशी

ठाकरे गटात असल्यानेच जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप

ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी अलिबाग कार्यालयात दुसर्‍यांदा चौकशी केली. या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण ठाकरे गटात असल्यामुळेच शिंदे सरकार आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राजन साळवी यांनी केला.

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून त्रास देत आहेत, मात्र सरकारच्या दडपशाहीला आपण भीक घालत नाही, असे राजन साळवी म्हणाले.

मालमत्तेच्या चौकशीबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना नोटीस पाठवली होती. त्यानुसार १४ डिसेंबरला साळवी एसीबीच्या अलिबाग विभागीय कार्यालयात हजर झाले होते. यावेळी त्यांची साडेचार तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी २० जानेवारीला कागदपत्रे सादर करणार असल्याचे साळवी यांनी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता राजन साळवी एसीबीच्या अलिबाग येथील कार्यालयात कागदपत्रे घेऊन हजर झाले.

यानंतर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना माझे मतदार, जनता यांना राजन साळवी काय आहे हे माहीत आहे, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत उपस्थित होते.