घरताज्या घडामोडीPower Demand: देशात विजेच्या मागणीचा रेकॉर्ड ब्रेक ! वीज मागणीच्या नव्या उच्चांकाची...

Power Demand: देशात विजेच्या मागणीचा रेकॉर्ड ब्रेक ! वीज मागणीच्या नव्या उच्चांकाची नोंद

Subscribe

वाढत्या तापमानाचा परिणाम हा विजेच्या मागणीवरही झालेला आहे. देशातील विजेच्या मागणीतील नवा उच्चांक हा २६ एप्रिल रोजी गाठण्यात आला. मंगळवारी दुपारी २.५१ वाजता विजेच्या मागणीत आतापर्यंतची सर्वाधिक अशी नोंद झाली. विजेच्या मागणीत २०१.०६६ गिगावॉट इतका नवा उच्चांक देशात गाठला गेला. याआधीच्या विजेच्या मागणीचा उच्चांक हा ७ जुलै २०२१ रोजी २००.५३९ गिगावॉट इतका होता. कोरोनाच्या संकटानंतरची अर्थव्यस्थेला आलेली गती आणि उद्योगांच्या वाढत्या विजेच्या मागणीमुळेच देशात विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे केंद्राच्या ऊर्जा विभागाने म्हटले आहे.

- Advertisement -

देशात मार्च महिन्यात ऊर्जेच्या मागणीत झालेली वाढ ही ८.९ टक्के इतकी होती. यापुढच्या काळातही आणखी विजेची मागणी वाढण्याची शक्यता केंद्रीय ऊर्जा विभागाने वर्तवली आहे. येत्या काळात विजेची मागणी ही २१५ गिगावॉट ते २२० गिगावॉट ही येत्या मे ते जून या कालावधीत होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील विजेची वाढती मागणी पाहता शासकीय कंपन्या आणि इतर घटकांमार्फतही अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध स्त्रोतांच्या माध्यमातून विजेची मागणी पूर्ण करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे ऊर्जा विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) ने येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्रापासून ते ओरिसा आणि पश्चिम बंगालपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस ही उष्णतेच्या लाटेची परिस्थिती देशात राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी सरासरी तापमानापेक्षा जेव्हा तापमान हे सरासरी ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस अधिक असते तेव्हा त्या परिस्तितीला उष्णतेची लाट असे म्हणतात.

- Advertisement -

महानिर्मितीची एतिहासिक कामगिरी

महाराष्ट्रातही विजेच्या मागणीचे नवनवीन उच्चांक होत आहेत. अशावेळी महाराष्ट्राला वीज पुरवणाऱ्या महानिर्मिती कंपनीनेही एतिहासिक अशी कामगिरी केली आहे. आज दिनांक २७ एप्रिल रोजी महानिर्मितीच्या इतिहासात एक अनमोल कामगिरी साध्य झाली आहे. राज्यामध्ये सातत्याने वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र येथील ७ औष्णिक संच, कोराडी येथील ४ संच, तसेच नाशिक, भुसावळ व परळी येथील प्रत्येकी ३ संच, खापरखेडा येथील ५ संच व पारस येथील २ अशा एकूण २७ औष्णिक संचामधून लक्षणीय वीजनिर्मिती सुरु आहे. सर्वच्या सर्व २७ औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती सुरु असण्याची महानिर्मितीच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मा.ना. मुख्यमंत्री तसेच मा.ना. ऊर्जा मंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन ८००० मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -