काही मंत्र्यांच्या मुलांनी पात्रता नसतानाही राजकारणात जागा बळकावल्या, घराणेशाहीवरून काँग्रेसची मोदींवर टीका

Soniya Gandhi

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भाषण करताना विरोधकांना लक्ष्य केलं आहे. मोदींनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका केल्यानंतर काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला आहे.

राजकारणातील घराणेशाहीनं देश पोखरला आहे. देशातील प्रतिभा संपवून टाकली आहे. या घराणेशाहीचा द्वेष केलाच पाहिजे. वेळीच या आजाराचा बंदोबस्त केला नाही तर तो आक्राळविक्राळ रूप धारण करील, अशी टीका पीएम नरेंद्र मोदी यांनी केली होती. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी तात्काळ मोदींच्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

घराणेशाहीबद्दल मोदी जे काही बोलत होते, ते कुणाबद्दल बोलत होते माहीत नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मोदी सरकारमधील काही मंत्र्यांच्या मुलांनी कुठलीही पात्रता आणि अनुभव नसताना क्रिकेट , राजकारणातील महत्त्वाच्या जागा बळकावल्या आहेत. त्याबद्दल पंतप्रधान बोलले असावेत, असं म्हणत पवन खेरा यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

पवन खेरा यांच्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर संताप व्यक्त केला आहे. मागील ७५ वर्षात देशानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरुंसारख्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे, असा संताप सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

सोनिया गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारताने लोकशाही आणि घटनात्मक संस्थांना बळकट करताना आपल्या दूरदर्शी नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली स्थापन केली पाहिजे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.


हेही वाचा : आत्ममग्न सरकार देशाच्या गौरवशाली कामगिरीला तुच्छ लेखण्यात व्यस्त, सोनिया गांधींचा घणाघात