घरCORONA UPDATECorona Update : बहुतांश देशात कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा अन् दाखवण्यात येणाऱ्या आकड्यात बरीच...

Corona Update : बहुतांश देशात कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा अन् दाखवण्यात येणाऱ्या आकड्यात बरीच तफावत!

Subscribe

भारतामध्ये कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा हा दाखवण्यात आलेल्या आकड्याच्या तीन पट असण्याची शक्यता आहे. 

मागील वर्षीपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स आणि इवॅल्युवेशन या संस्थेने (IHME) कोरोनासंदर्भात अभ्यास केला आहे. यात बहुतांश देशात कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा आणि दाखवण्यात येणाऱ्या आकड्यात बरीच तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही देशांमध्ये कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा हा आतापर्यंत दाखवण्यात आलेला आकड्याच्या १३ पट असल्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे.

भारतामध्ये मृतांचा खरा आकडा तीन पट

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५.७ लाख कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची अधिकृत नोंद आहे. मात्र, आयएचएमईच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील मृतांचा खरा आकडा ९ लाखांहूनही अधिक असू शकतो. तसेच भारतामध्ये आतापर्यंत २.२ लाख व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु, भारतामध्ये कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा हा दाखवण्यात आलेल्या आकड्याच्या तीन पट म्हणजेच ६.५ लाख इतका असण्याची शक्यता आयएचएमईने वर्तवली आहे.

- Advertisement -

बऱ्याच देशांमध्ये आरोग्य यंत्रणा कमकुवत

हीच परिस्थिती मेक्सिकोमध्ये आहे. मेक्सिकोत कोरोनाबाधित मृतांचा खरा आकडा ६.१७ लाख इतका असू शकेल, पण दाखवण्यात येणारा आकडा हा २.१७ लाख असल्याचे आयएचएमईचा रिपोर्ट सांगतो. मात्र, बरेच देश मृतांचा आकडा जाणूनबुजून लपवत नसल्याचे आयएचएमईचे म्हणणे आहे. बऱ्याच देशांमध्ये आरोग्य यंत्रणा कमकुवत असल्याने मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इजिप्त आणि रशियाला कोरोनाचा मोठा फटका बसल्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आली आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -