अजित डोवाल यांच्या सुरक्षिततेत ढिसाळपणा प्रकरणी 3 सीआयएसएफ कमांडो बडतर्फ, 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या

ajit dowal

नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला अजित डोवाल यांच्या निवासस्थानी सुरक्षेत ढिसाळपणा झाला होता. या प्रकरणी तीन CISF कमांडोना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर VIP सुरक्षा युनिटच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या निवासस्थानी सुरक्षेत ढिसाळपणा केल्याप्रकरणी बदली करण्यात आली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. अजित डोवाल यांना केंद्रीय VIP सुरक्षा यादी अंतर्गत ‘Z Plus’ श्रेणीतील सुरक्षा आहे. त्यांना सीआयएसएफच्या एसएसजी युनिटकडून सुरक्षा कवच दिले जाते.

 दंडात्मक कारवाई –

16 फेब्रुवारीच्या घटनेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 5 अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केल्यानंतर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या तीन कमांडोना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या व्हीव्हीआयपी सुरक्षा युनिटचे नेतृत्व उपमहानिरीक्षक (डीआयजी) करतात आणि त्यांच्या दुसऱ्या कमांडंटच्या दर्जाच्या वरिष्ठ कमांडंटची बदली करण्यात आली आहे.

 १६ फेब्रुवारी रोजी घडली होती घटना –

16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास बेंगळुरू येथील एका व्यक्तीने मध्य दिल्लीतील NSA अजित डोवाल यांच्या उच्च-सुरक्षा गृहात आपली कार नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षेचा भंग झाला. बडतर्फ केलेले तीन कमांडो त्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून NSA निवासस्थानी उपस्थित होते. या व्यक्तीला  दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.