नवी दिल्ली : भारताबाहेर मोठ्या प्रमाणात परदेशी चलन पुरवठा करण्याच्या व्यवहारांमध्ये काही कंपन्या सहभागी आहेत, अशी माहिती ‘खात्रीलायक सूत्रांकडून’ ईडीला मिळाली होती त्यानुसार देशातील चार शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली ज्यात मुंबईचाही समावेश होता.
विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’ अंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेनं कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना छापेमारी केलेल्या एका ठिकाणी चक्क फ्रण्ट लोड वॉशिंग मशीनमध्ये लपवलेल्या नोटा सापडल्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या छापेमारीनंतर 47 बँक खात्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा – Sadanand Date : सदानंद दाते NIA चे महासंचालक; केंद्राचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास
ईडीने दिली माहिती
ईडीने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅपरीकोरनियान शिपिंग अँड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या आणि या कंपनी संचालक विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या कंपन्यांच्या परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली. मात्र ही छापेमारी नक्की कधी केली याची माहिती ईडीने दिलेली नाही. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकात्यामधील वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या कंपन्यांवर छापेमारी?
विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या मालकीच्या ज्या कंपन्यांच्या परिसरात छापेमारी करण्यात आली त्यामध्ये लक्ष्मीटन मॅरीटाइम, हिंदुस्तान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टवार्ट अलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि संचालक तसेच गुंतवणूकदार संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्या मालकीच्या संपत्तीवर छापे टाकण्यात आले.
हेही वाचा – LokSabha Elections 2024 : शिंदे, पवार, आठवले भाजपाचे स्टार प्रचारक; महाराष्ट्रातील यादी जाहीर
वॉशिंग मशीनमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल
या छापेमारीदरम्यान एका ठिकाणी चक्क वॉशिंग मशिनमध्ये नोटा लपवल्याचं आढळून आल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. पैशांनी भरलेले हे मशीन नेमके कुठे सापडले याचा खुलासा ईडीने केलेला नाही. तपासामध्ये एकूण 2.54 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली. त्यापैकी मोठा हिस्सा हा एका वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवला होता. या फ्रण्ट लोड मशीनचे दार उघडताच आतमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पाहून अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला.