FASTag साठी मुदतवाढ, 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवली तारीख

आता 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमच्या वाहनांना 'फास्टॅग' लावता येणार

देशात नव वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते. 1 जानेवारीपासून 100 टक्के टोल ‘फास्टॅग’द्वारे वसूल केला जाणार असल्याची घोषणाही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली होती. मात्र ही तारीख वाढवून 15 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

National Highways Authority of India ने लोकांना ‘फास्टॅग’ मिळण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ही मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना टोल भरण्यासाठी 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी ‘फास्टॅग’ National Highways Authority of India ने अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. मात्र आता 1 जानेवारीपर्यंत असणारी तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवून नागरिकांना दिलासा दिला आहे.

वाहनांना फास्टॅग लावल्याने प्रवाशांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत देखील होणार आहे. सध्याच्या घडीला देशात फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच 80 टक्के रकमेची वसुली ‘फास्टॅग’द्वारे केली जात आहे. नव्या वर्षात तुम्ही जर बाहेर जाणार असाल आणि तुमच्या वाहनामध्ये ‘फास्टॅग’नसेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

‘फास्टॅग’ म्हणजे काय

फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी – RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. सध्या रोख पैसे देऊन किंवा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो. नव्या नियमांनुसार, हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट किंवा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.


‘जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार’