
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या नुकतंच भारतात आठव्या रायसिना संवाद कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून आल्या होत्या. जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या की, जगभरातील सर्व नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लाडके नेते आहेत आणि ते एक प्रमुख नेते आहेत हे आज सिद्ध झाले आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. इटलीच्या पंतप्रधानांचे हे बोलणं ऐकून पीएम मोदीही हसू लागले.
पंतप्रधान मोदींसोबत मीडियाला संबोधित करताना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, “इटलीला आशा आहे की जी-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात भारत युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या प्रक्रियेला सुलभ करण्यात आणि वाटाघाटी करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावू शकेल. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, आम्ही इंडो पॅसिफिक महासागर उपक्रमाचा विचार करण्याचं ठरवलं आहे. कारण आमचा आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर विश्वास आहे आणि हे सार्वभौमत्व आणि संपूर्ण अखंडतेच्या नियमांवर आधारित असावं.
इटलीच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडो-पॅसिफिकमध्ये इटलीच्या सक्रिय सहभागाचेही आम्ही स्वागत करतो. इटलीने इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला ही अतिशय आनंदाची बाब आहे. पीएम मोदी म्हणाले की, “आम्ही राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे पूर्ण करत आहोत आणि आम्ही या संबंधांना धोरणात्मक भागीदारीकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे.” ते पुढे म्हणाले की, आम्ही आमचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. आमची मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहीम भारतात गुंतवणुकीच्या अफाट संधी देत आहे.
#WATCH | …(PM Modi) is the most loved one of all (leaders) around the world. This is really proven that he has been a major leader and congratulations for that: Italian PM Giorgia Meloni pic.twitter.com/DF2ohzicqu
— ANI (@ANI) March 2, 2023
दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात भारत आणि इटली खांद्याला खांदा लावून चालत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यापुढे बोलताना ते पुढे म्हणाले की, भारत आणि इटलीदरम्यान आज स्टार्टअप ब्रिजच्या स्थापनेची घोषणा होत आहे, ज्याचे आम्ही स्वागत करतो. याच्या मदतीने आम्ही वैविध्य, इतिहास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नावीन्य, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील दोन्ही देशांची कामगिरी जागतिक पटलावर दाखवू शकू.