घरदेश-विदेशJammu Kashmir Terrorists : सोपोरमध्ये लष्कर ए तोयब्बाच्या तीन दहशतवाद्यांना अटक; टार्गेट...

Jammu Kashmir Terrorists : सोपोरमध्ये लष्कर ए तोयब्बाच्या तीन दहशतवाद्यांना अटक; टार्गेट किलिंगचा रचला होता प्लॅन

Subscribe

तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन पिस्तूल, तीन मॅगझिन, 22 काडतूसे, एक ग्रेनेड व 79800 रुपयांची रोकड जप्त केली आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने लष्कराच्या जवानांना आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करत अशांतता पसरवण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशात सुरक्षा दलाला सोमवारी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. यावेळी लष्कराच्या जवानांनी सोपोरमधून लष्कर-ए-तोयब्बाच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून रात्री काही ठराविक लोकांचे टार्गेट किलिंग करण्यासोबत सुरक्षा दलाच्या नाका पार्टीवर हल्ला करण्याचा कट होता. मात्र सुरक्षा दलाने हा कट उधळून लावला आहे. तसेच दहशतवाद्यांकडून तीन पिस्तूल आणि सुमारे 79,800 रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

पोलिस प्रवक्त्याच्या माहितीनुसार, सोपोर पोलिसांना संध्याकाळी त्यांच्या यंत्रणेकडून समजले होते की लष्कर-ए-तोयब्बाचे तीन दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये रात्रीच्या वेळी टार्गेट किलिंगचा कट रचणार आहेत. तसेच वदुरा भागातील सुरक्षा दलाच्या नाका पार्टीवरही ते हल्ला करणार होते. यावेळ पोलिसांनी लष्कराच्या 22 आरआर आणि सीआरपीएफ जवानांसह वदुरबाला गावाजवळील सोनारवानी पुलावर नाकाबंदी केली. सूर्यास्तानंतर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नाका पार्टीला तीन संशयित तरुण पुलाजवळ येताना दिसले.

- Advertisement -

यावेळी जवानांनी संशयित तरुणांना इशारा करून थांबण्यास सांगितले. यावेळी ही नाकाबंदी त्यांच्यासाठीच असल्याचे तीन संशयित तरुणांना समजले. त्यांनी तात्काळ मागे पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला. पाठलाग करणाऱ्या सैनिकांनी स्वतःचे संरक्षण करताना पूर्ण संयम बाळगला. तसेच सर्वसामान्यांची उपस्थिती लक्षात घेऊन गोळीबार न करता आपली व्यावसायिक क्षमता सिद्ध करत तीन तरुणांना पकडले.

तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन पिस्तूल, तीन मॅगझिन, 22 काडतूसे, एक ग्रेनेड व 79800 रुपयांची रोकड जप्त केली आहे. सुरक्षा दलांनी चौकशी केली असता हे तिघेही लष्करचे तेच दहशतवादी असल्याची माहिती मिळाली, ज्यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर नाकाबंदी लावण्यात आली होती.

- Advertisement -

तुफैल अहमद मीर मुलगा अब्दुल मजीद मीर (रा.गुंड मोहल्ला बरात कलान) ओवेस अहमद मीर मुलगा हसन मीर (रा.मीर मोहल्ला, बरात कलान) आणि शब्बीर अहमद वागे मुलगा नजीर अहमद वागे (रा. मस्जिद मोहल्ला, पेथाबाग) अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात या तिन्ही दहशतवाद्यांनी लष्कर-ए-तोयब्बा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे मान्य केले. या तिघांविरुद्ध बोमई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चौकशीच्या आधारे येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे.


Raghunath Kuchik rape case : चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच केले आरोप- पीडितेचा यू टर्न

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -