Jignesh Mevani: काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानींना कोर्टाचा मोठा झटका, तीन महिन्यांचा कारावास

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना महेसाणा कोर्टाने मोठा दणका दिला आहे. त्यांच्यासह १२ जणांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचसोबत त्यांना एक हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. शिक्षा झालेल्यांमध्ये काँग्रेसच्या महिला नेत्याचाही सहभाग आहे.

परवानगी न घेता रॅली काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर महेसाणा कोर्टाने जिग्नेश मेवानींसह राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण पाच वर्षे जुने असून २०१७ मध्ये या आरोपींनी आझादी कूच रॅली काढली होती. मात्र, यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपांखाली न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरविले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांच्या न्यायालयाने रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे, असं निरीक्षण नोंदवलं आहे.

जिग्नेश मेवानी हे गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत. तसेच गुजरातच्या वडगाम येथून आमदार आहेत. एक वकील, कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला समर्थन दिले होते.


हेही वाचा : वाढत्या तापमानाबद्दल पीएम मोदींची महत्वाची बैठक, मान्सूनबद्दल घेणार आढावा