जम्मू-कश्मीर- अखेर बेपत्ता जवानांचे मृतदेह सापडले

जम्मू कश्मीरमधील पूंछ भागात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर बेपत्ता झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्यासह दोन जवानांचे मृतदेह जंगलात सापडले आहेत. यामुळे या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या ९ झाली आहे.

जम्मू-कश्मीरमधील मेंढर, पूंछ येथील नर खासच्या घनदाट जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यामुळे जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र जवान डेरा की गली या जंगलाच्या भागात शिरल्याची माहिती मिळताच दहशतवाद्यांनी जवानांना जंगलाच्या मध्यभागी येऊ दिले त्यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने जोरदार चकमक उडाली. याचवेळी जंगलात दहशतवाद्यांचा पाठलाग करताना एका लष्करी अधिकाऱ्यासह दोन जवान बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सापडले असून या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या ९ झाली आहे.