घरदेश-विदेश'टीम राहुल'चा आणखी एक मोहरा गळाला! ज्योतिरादित्य सिंदियांचा राजीनामा!

‘टीम राहुल’चा आणखी एक मोहरा गळाला! ज्योतिरादित्य सिंदियांचा राजीनामा!

Subscribe

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांनी देखील काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या युवा टीममधल्या इतरांनी देखील राजीनामा द्यायला सुरूवात झाली आहे. एकीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रात ज्योतिरादित्य सिंदिया यांनी देखील पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अशा प्रकारे पक्षातून युवा नेतृत्वाने माघार घेतल्यास त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भिती देखील काँग्रेसला वाटू लागली आहे. ज्योतिरादित्य सिंदियांनी ट्विटरवर त्यांचा राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला आहे.

- Advertisement -

‘लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांनी दिलेला कौल मी स्वीकारला आहे. तसेच या पराभवाची देखील जबाबदारी माझी आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा मी राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे’, असं सिंदिया यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य सिंदिया, सॅम पित्रोदा ही मंडळी राहुल गांधींच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या काळापासून त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राहुल गांधींनीच राजीनामा दिल्यानंतर त्यांचीच री त्यांच्या टीममेट्सनी ओढल्याचं देखील बोललं जात आहे.

‘वाजपेयींनीही राजीनामा दिला नव्हता’

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून मात्र या राजीनाम्यांवर निशाणा साधला जात आहे. ‘अटल बिहारी वाजपेयींना देखील पराभव पाहावा लागला होता. मात्र त्यांनी कधी राजीनामा देऊन पळ काढला नाही’, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर केली होती.


हेही वाचा – अटलजींनी कधी पराभव झाला म्हणून राजीनामा दिला नाही-उद्धव ठाकरे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -