घरताज्या घडामोडीVideo: पोलिसांनी गाडी का बदलली? त्या व्हिडिओमुळे युपी पोलीस अडचणीत

Video: पोलिसांनी गाडी का बदलली? त्या व्हिडिओमुळे युपी पोलीस अडचणीत

Subscribe

देशभरात सध्या गाजत असलेल्या विकास दुबे प्रकरणाला नवे वळण मिळत आहे. १० जुलै, शुक्रवार रोजी सकाळी पोलीसांच्या एनकाऊंटरमध्ये विकास दुबे मारला गेला. मात्र त्यानंतर एनकाऊंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ९ जुलै रोजी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल मंदिरातून विकास दुबेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले होते. युपी पोलिसांची STF पथक रस्तेमार्गाने त्याला कानपूरला घेऊन जात असताना कथित एनकाऊंटरमध्ये दुबेचा खात्मा झाला. मात्र ज्या वाहनाचा अपघात झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे, त्या वाहनात मुळात आधीपासून विकास दुबे नव्हताच. हे दाखवणारा एक व्हिडिओ आता समोर येत आहे.

पोलिसांनी जी कथा माध्यमांना सांगितली त्यावर आज तक या वृत्तसमुहाने प्रश्न उपस्थित केला आहे. आज तकची टीम ज्या गाडीतून विकास दुबेला नेले जात होते, त्या गाडीच्या मागे वार्तांकन करत होती. सुरुवातील विकास दुबेला टाटा सफारी या गाडीतून आणले गेले होते. मात्र एनकाऊंटरच्या घटनास्थळी महिंद्रा TVU 300 या गाडीचा अपघात झालेला दिसत आहे. मग ही गाडी कधी आणि का बदलली गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

आज तकच्या वार्ताहराने सांगितले की, “आम्ही जेव्हा टाटा सफारी गाडीच्या मागे जात होतो, तेव्हा मधेच पोलिसांनी आम्हाला अडवले. एसटीएफची समजूत काढण्यात आमचा वेळ गेला. त्यानंतर जेव्हा आम्ही पुढे पोहोचलो तर वाटेत आम्हाला एक महिंद्रा गाडी उलटलेली दिसून आली.”

ज्या ठिकाणी एनकाऊंटर झाला. त्याच्या २० किलोमीटर अलीकडे बारा जोड नामक टोल नाका होता. त्या टोलनाक्यावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विकास दुबे टाटा सफारी गाडीत बसलेला दिसत आहे.

- Advertisement -

पोलिसांनी जेव्हा गाडीच्या अदलाबदलीबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा कानपूरचे पोलीस प्रमुख मोहित अग्रवाल यांनी हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे विकास दुबे उज्जैनपासूनच महिंद्राच्या गाडीत बसून आला होता. ज्या गाडीचा अपघात झालेला आपण सर्वांनी पाहिला. कोणतीही गाडी बदलण्यात आलेली नाही.”

काय आहे पुर्ण प्रकरण?

२-३ जुलै रोजी कानपूरच्या बिकरू गावात पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला होता. विकास दुबेच्या घरी छापा मारण्यासाठी गेले असता पोलीस आणि दुबेच्या गुंडामध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये आठ पोलीस शहीद झाले. यानंतर विकास दुबे फरार झाला होता. त्याच्यावर पाच लाखाचे बक्षिसही लावण्यात आले होते.

७ जुलै रोजी विकासचा साथीदार अमर दुबेचे एनकाऊंटर करण्यात आले. त्यानंतर ९ जुलै रोजी प्रभात मिश्रा आणि बऊअन या आणखी दोन साथीदारांचा एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याच दिवशी विकास दुबे मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील महाकाल मंदिरात लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला पकडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -