काश्मीरमध्ये १९९० ची पुनरावृत्ती, हिंदू टार्गेटवर

गेल्या दोन दिवसात दहशतवाद्यांनी कश्मीर खोऱ्यात दोन हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची हत्या केल्याने कश्मीर मध्ये १९९० ची पुनर्रावृत्ती होत असल्याचे बोलले जात आहे.

पृथ्वीवरील स्वर्ग, भारताचे नंदनवन म्हणून जगभरात ओळखला जाणाऱ्या कश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी सक्रिय झाले असून हिंदूना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. गेल्या दोन दिवसात दहशतवाद्यांनी कश्मीर खोऱ्यात दोन हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची हत्या केल्याने कश्मीर मध्ये १९९० ची पुनर्रावृत्ती होत असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी येथे दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची हत्या केली. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या अन्यायाविरुद्ध येथील हिंदू नागरिक  रस्त्यावर उतरले आहेत. याचदरम्यान दहशतवाद्यांनी एका हिंदू बँक कर्मचारी विजय यांची हत्या केल्याने पुन्हा एकदा कश्मीर खोरे पेटून उठले आहे. या टार्गेट किलिंगचे पडसाद कश्मीरमधील आजूबाजूच्या परिसरातही उमटले आहेत. सलग घडलेल्या या दोन हत्यांमुळे १९९० साली घडलेल्या कश्मीरी हिंदू पंडितांच्या हत्याकांडाची तर ही पुनर्रावृत्ती नाही ना असा प्रश्न प्रत्येक कश्मीरी हिंदूंना पडला आहे. विशेष म्हणजे ज्या हिंदूंना दहशतवाद्याकडून टार्गेट करण्यात येत आहे ते कश्मीरमध्ये राहण्यास येत असलेले कश्मीर पंडित आणि हिंदू नागरिक आहेत. यातील काहीजण मजुर असून कश्मीर खोऱ्यातील हिंदूमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी त्यांना निशाणा करत असल्याचे बोलले जात आहे. याचपार्श्वभूमीवर ७ दिवसाआधी २४ मे पोलिसकर्मचारी सैफ कादरी आणि २५ मे रोजी कश्मीरी अभिनेत्री अमरीन भट्ट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

हिंदूंच्या हत्यांचे हे सत्र गेल्या वर्षी ८ जून पासून सुरू झाले आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमध्ये केमिस्ट एमएल बिंद्रू यांची हत्या करण्यात आली. या घटनेने कश्मीर मध्ये खळबळ उडालेली असतानाच दोन दिवसांनी ७ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षिका दीपक चंद यांची हत्या केली. या घटनेमुळे हिंदूंवर राहते घर सोडण्याची वेळ आली आहे. मे महिन्यात टार्गेट किलिंगच्या ८ घटना घडल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत. रजनी बाला यांच्या हत्येआधी १२ मे रोजी दहशतवाद्यांनी बडगाम येथील सरकारी कार्यालयात घुसून अधिकारी राहुल भट्ट यांची हत्या केली होती. या घटनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतिचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी जाणीवपूर्वक हिंदूना लक्ष्य करत आहेत. कधी कामाच्या शोधात युपी बिहारमधून कश्मीरमध्ये आलेल्या हिंदूंना टार्गेट केले जात आहे. तर कधी कश्मीरी पंडित आणि सुरक्षा जवानांना ठार केले जात आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सरकारकडून कश्मीरी हिंदूंना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असून जीवाच्या भीतिने आतापर्यंत ३५० कश्मीरी पंडितांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.