दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली; केजरीवाल म्हणाले, आम्ही भगतसिंह…

 

नवी दिल्लीः मनी लॉंड्रींग प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा फोटो शेअर करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही सरदार भगतसिंह याचे शिष्य आहोत. अन्याय आणि हुकुमशाहविरोधात आमचा लढा सुरुच राहिल, असा हल्लाबोल केजरीवाल यांनी भाजपवर केला आहे.

सत्येंद्र जैन यांना उपचारासाठी सोमवारी सफदरगंज रुग्णालयात नेण्यात आले. तेथील सत्येंद्र जैन यांचा फोटो व्हायरल झाला. या फोटोत ते अशक्त दिसत आहेत. या फोटोवरुन अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली. भाजप सरकारची ही दडपशाही जनता बघत आहे. अत्याचार करणाऱ्यांना देव माफ करत नाही. या संघर्षात देव आमच्या सोबत आहे.

केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सौरभ भारद्वाज यांनीही भाजपवर निशाणा साधला. दिल्लीचे आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या सत्येंद्र जैन यांना तुम्ही दिलेल्या वागणुकीची शिक्षा तुम्हालाही मिळेल. देव तुम्हाला माफ करणार नाही, असे ट्वीट भारद्वाज यांनी केले.

गेल्या वर्षी सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकने (ED) अटक केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. मणक्याचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने डीडीयू रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर जैन यांनी अजून एका डॉक्टराचा सल्ला घेण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले.