घरदेश-विदेशराहुल गांधींसमोरच 'या' दोन काँग्रेस नेत्यांमध्ये राडा!

राहुल गांधींसमोरच ‘या’ दोन काँग्रेस नेत्यांमध्ये राडा!

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे स्थानिक उमेदवार निश्चित करण्याआधीच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं चित्र निर्माण झालं. त्यांच्यातले वाद सोडवण्यासाठीच एका नव्या समितीची नेमणूक करावी लागली.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली खरी, पण भाजपच्या आव्हानासोबतच आता काँग्रेसला अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचाही सामना करण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीची तयारी सध्या सर्वच पक्ष करत आहेत. उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सध्या सुरू असून काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी स्वत: भोपाळमध्ये हजर होते. मात्र, त्यांच्यासमोरच पक्षाचे मध्य प्रदेशमधील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यामध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे काँग्रेसचं मिशन विधानसभा अधिकच खडतर झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

गटबाजीतून झाला राडा

गेल्या १५ वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या अॅण्टि इन्कम्बन्सीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून त्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशवर लक्ष केंद्रित केले आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राहुल गांधी यांनी भोपाळमध्ये पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे मध्य प्रदेशमधील अनेक ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, उमेदवारांचे नाव निश्चित करताना ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह या दोघांमध्ये बैठकीतच खडाजंगी झाली. आपापल्या गटातल्या उमेदवारांना तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न करताना या दोघांमध्ये वाद झाला.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – तर मोदींनी तुरुंगात जावे लागेल-राहुल गांधी


वाद निस्तरायला नेमली समिती

विशेष म्हणजे, एकीकडे उमेदवार निश्चित करण्यासाठी जमा झालेल्या समितीमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे त्यांच्यातलाच वाद निस्तरण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमण्याची वेळ राहुल गांधींवर आली. हे वाद इतके विकोपाला गेले होते, की उमेदवार निश्चिती सोडून यांच्यातले वाद सोडवण्यातच बैठकीचा वेळ गेला. रात्री उशिरापर्यंत अशोक गेहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल यांनी बैठक घेऊन वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे वाद काही मिटू शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या वादावर स्थानिक काँग्रेसमधून कुणालाही भाष्य करण्यास मनाई करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -