क्वारंटाईन सेंटरमध्येही भेदभाव; दलित महिलेने तयार केलेलं जेवण नाकारलं

लीलावती देवी यांनी क्वारंटाईन केंद्रावर जाऊन पाच लोकांसाठी जेवण तयार केलं. तरुणाने लीलावती देवीने बनविलेले अन्न खाण्यास नकार दिला.

quarantine meal

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज १४ एप्रिल रोजी साजरी होत आहे. अस्पृश्यतेच्या विरोधात बाबासाहेबांनी संघर्ष केला. आश्चर्य म्हणजे २१ व्या शतकातही दलितांमध्ये भेदभाव केला जात आहे. अस्पृश्यता आणि जातीभेदाची ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा संपूर्ण देश कोरोना विषाणूविरूद्ध लढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्येही दलितांमध्ये भेदभाव केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये क्वारंटाईन असलेल्या युवकाने दलित महिलेने तयार केलेले जेवण खाण्यास नकार दिला. पोलिसांनी या व्यक्तीविरूद्ध एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली असून सिराज अहमद असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती कुशीनगरमधील खाडा पोलिस स्टेशन परिसरातील भुजुली खुर्द गावची आहे. हा तरुण २ मार्च रोजी दिल्लीहून आला होता, त्यामुळे त्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. सिराज आणि इतर चार लोक गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

१० एप्रिलला घडली घटना

गावच्या दलित महिला प्रमुख लीलावती देवी यांनी १० एप्रिल रोजी क्वारंटाईन केंद्रावर जाऊन पाच लोकांसाठी जेवण तयार केलं. अहवालानुसार स्वयंपाक त्या दिवशी क्वारंटाईन केंद्रावर होता. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सिराज अहमद याने लीलावती देवीने बनविलेले अन्न खाण्यास नकार दिला. नंतर महिला प्रमुखांनी घटनेची माहिती उपविभागीय दंडाधिकारी देशदीपक सिंह आणि बीडीओ रमाकांत यांना दिली.

रविवारी झाला एफआयआर दाखल

यासंदर्भात रविवारी लिलावती देवी यांनी एफआयआर दाखल केला आहे. खड्डा पोलिस स्टेशनचे अधिकारी आर.के. यादव यांनी सांगितलं की, अहमदवर एससी एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार लीलावती देवी यांच्या घरी पोहोचले

या घटनेनंतर रविवारी आमदार विजय दुबे महिला प्रमुख लीलावती देवी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना आपल्या हाताने तयार केलेले भोजन त्यांना देण्यास सांगितलं. ते म्हणाले की अस्पृश्यता हा एक सामाजिक रोग आहे आणि तो कोणत्याही किंमतीत सहन केला जाऊ शकत नाही.