घरदेश-विदेशThackeray Group : ‘चारशे पार’चा मुजरा आणि ‘पुन्हा येईन’चा गजरा; उद्धव गटाची...

Thackeray Group : ‘चारशे पार’चा मुजरा आणि ‘पुन्हा येईन’चा गजरा; उद्धव गटाची भाजपवर सडकून टीका

Subscribe

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार आणि आता भाजपवासी झालेल्या नवीन जिंदाल यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले आहेत. आतापर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्याच सतरंज्या उचलाव्या लागतील, अशी सणसणीत टीका ठाकरे गटाने केली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणातील आरोपी म्हणून नवीन जिंदाल यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. मात्र, जिंदाल यांनी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेत लगेचच भाजपात प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं तिकीट दिले. यामुळे ठाकरे गटाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.

भाजपा हा तर कोठ्यावरचा पक्ष

भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान), 409 व 420 आणि भ्रष्टाचारविरोधी कलम 13 (1) (सी) आणि 13 (1) (डी) अंतर्गत नवीन जिंदाल यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. थोडक्यात, जिंदाल यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. ते लक्षात घेऊन भाजपने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे ठरवलेच होते. मात्र, आता जिंदालच भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्याच सतरंज्या उचलाव्या लागणार आहेत. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सध्याचे हेच चरित्र बनले आहे. देशातील भ्रष्टाचाराचे ‘कोठे’ बंद करण्याचे वायदे करून हे लोक सत्तेवर आले, पण कोठ्यांवरील पैशांचा खणखणाट पाहून हेच लोक कोठ्यावर बसले आणि गिऱ्हाईकांचे मन रिझवू लागले. थोडक्यात, भाजप हा अशाप्रकारे कोठ्यावरचा पक्ष बनला आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

- Advertisement -

न्यायाधीशांना लाच देण्याचा प्रयत्न करणारे भाजपात

“निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून अनेक ठेकेदार, गुन्हेगार, भ्रष्ट लोकांनी भाजपच्या कोठ्यावर दौलतजादा केली. त्यात श्रीमान जिंदाल यांचा समावेश आहे का? याचा शोध घ्यावाच लागेल. ज्या मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक केली त्या प्रकरणातला मुख्य आरोपी अरबिंदो फार्माचा संचालक सरथ रेड्डी हा आहे. त्याला अटक करताच त्याने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला 35 कोटी रुपये दिले आणि सरकारी माफीचा साक्षीदार बनत केजरीवाल विरोधात साक्ष दिली. एकीकडे कोळसा घोटाळ्यातील जिंदाल यांना भाजपमध्ये प्रवेश दिला, त्याच वेळी कर्नाटकात जनार्दन रेड्डी यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकत भाजपमध्ये घेतले. हे रेड्डी बेकायदेशीर खाण उद्योगाचे बादशहा मानले जातात आणि सीबीआयने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले होते. जामीन मिळावा म्हणून हायकोर्टाच्या न्यायाधीशांना 40 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न या जनार्दन रेड्डी यांनी केला, तो कोर्टानेच उघड केला. जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबाने बेकायदा खाण व्यवसायातून प्रचंड पैसा कमावला. ते तुरुंगात गेले आणि आता गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाले. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन रेड्डींचा व्यवसाय पुन्हा बहरून येईल. त्या व्यवसायाचा लाभ भाजपला होईल. आणि जनार्दन रेड्डी यांच्यावरील सर्व खटले लवकरच संपतील, असा टोलाही ‘सामना’तून हाणला आहे.

भाजपा फक्त बदनामीचा धुरळा उडवते

“भारतीय जनता पक्षाचे हे असे चालले आहे. ज्यांना खरोखरच तुरुंगात टाकायचे त्यांच्याकडून भाजपने हजारो कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले किंवा जिंदालसारख्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे जिंदाल यांच्या विरुद्धचे आरोप आणि आंदोलन बनावट होते आणि भाजपने फक्त बदनामीचा धुरळा उडवला. देशभरात भाजपचे हेच धोरण आहे. भाजपची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे किंवा पराभवाच्या भयाने त्यांनी देशभरातील गुंड, झुंड तसेच भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्या सगळ्यांना निवडणुकीत उतरवायचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे एक प्रकारे ‘डिप्रेशन’ आहे. भाजपच्या डिप्रेशनमुळे भारतीय राजकारणाची वाट लागली. महाराष्ट्रापासून हरयाणापर्यंत सर्वत्रच भाजपने राजकारणाचा कोठा केला आहे. या कोठ्यावर नाचत ‘चारशे पार’चा मुजरा आणि ‘पुन्हा येईन’चा गजरा बांधून ते नाचत आहेत. जनताच हे कोठे बंद केल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीकाही अग्रलेखात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -