राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी वंदना चव्हाण यांना उमेदवारी

राज्यसभेतील उपसभापती पदासाठी ९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून त्याकरता विरोधकांकडून राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एनडीएने खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे.

vandana-chavan
खासदार वंदना चव्हाण

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सध्याचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचीत उपसभापतीची नेमणूक करण्यात येईल. याकरता ९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापूर्वीच त्यांच्या उमेदवाराचे नाव घोषित केले होते. त्यांनी जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. आता विरोधकांनीही उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे.

वंदना चव्हाण यांची प्रतिक्रीया

‘मला आनंद होईल जर एक महिला राज्यसभेवर उपसभापती पदावर निवडून येईल. पंरतू अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. विरोधकांची बैठक सुरू असून आम्ही प्रतिक्षा करत आहोत.’

पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण या पुण्यातील खासदार आहेत. त्यांचे वडिल विजय राव मोहिते हे नामवंत वकिल होते. तर वंदना यांचे पती हेमंत चव्हाण देखील मोठे वकिल आहेत. वंदना चव्हाण यांची १९९७-९८ साली पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. दरम्यान, त्या ऑल इंडिया काऊंसिल ऑफ मेयर्सच्या वाइस चेअरपर्सनही होत्या. राजकीय कारकिर्दीत सुरेश कलमाडी हे त्यांचे मार्गदर्शक असल्याचे म्हटले जाते.

राज्यसभेतील पक्षनिहाय जागा

  • एनडीए

भाजप ७३, जेडीयू ६, शिवसेना ३, अकाली दल ३ एआयएडीएमके १३, आरपीआय १, सिक्कीम डेमोक्रेटीक टिक फ्रंट १, तेलंगणा राष्ट्र समिती ६, नागा पिपल्स फ्रंट १, अपक्ष ४, नामनिर्देशीत ३ – एकूण ११५

  • यूपीए

काँग्रेस ५०, समाजवादी पक्ष १३, राष्ट्रवादी काँग्रेस ४, डीएमके ४, आरजेडी ५ इंडियन युनियन मुस्लिम लीग १, सीपीआयएम ५, तेलुगू देसम पार्टी ६, जेडीएस १, तृणमूल काँग्रेस १३, आम आदमी पक्ष ३, नामनिर्देशीत १ – एकूण ११३

  • इतर

बिजू जनता दल ९, वायएसआर काँग्रेस २, इंडियन नॅशनल लोक दल १, पीडीपी २, अपक्ष २ – एकूण १६