Pakistan Political Crisis : मी राजीनामा देणार नाही, पंतप्रधान इम्रान खान यांचं स्पष्टीकरण

Imran Khan No Trust Vote Parliament will be dissolved after Imran Khan's recommendation fresh election on 90 days announced

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या राजकारणातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी अनेक सहकारी पक्षांनी सत्ताधारी युतीतून काढता पाय घेतला. दरम्यान, शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करणं हे माझ्या रक्तात असल्यामुळे मी राजीनामा देणार नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलंय.

इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या जनतेला संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, साडेतीन वर्षात जी प्रगती पाकमध्ये झाली. ती कधीच झाली नाही. देशाच्या सार्वभौमत्वाचा विरोधक सौदा करत आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करणं हे माझ्या रक्तात असल्यामुळे मी राजीनामा देणार नाही, येत्या रविवारी पाकिस्तानचा फैसला होईल, असं इम्रान खान म्हणाले.

मी पंतप्रधानपदी राहिल्यास संबंध तोडण्याची अमेरिकेची धमकी

आपली सत्ता घालवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी ज्या कारवाया सुरू आहेत. त्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. माझ्याऐवजी इतर कुणी आल्यास अमेरिकेचा विरोध नाहीये. मी पंतप्रधानपदी राहिल्यास संबंध तोडण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. कथित पत्राची माहिती देताना इम्रान खान यांनी अमेरिकेवर आरोप केला आहे.

जर इम्रान खान सत्तेतून गेले तर पाकिस्तानला माफ करण्यात येईल. जर ते सत्तेत असतील तर पाकिस्तानला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

ना मी झुकणार, ना जनतेला झुकू देणार

अमेरिकेच्या नादाला लागून युद्धात भाग घेतल्याने पाकिस्तानची फरफट झाली. पाकिस्तानने दिलेल्या कुर्बानीबद्दल कुणी आभार मानले का? पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यात आले, त्यावर कुणी काही बोललं का? आता पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी अमेरिका काम करत आहे. परंतु मी झुकणार नाही आणि जनतेला झुकू देणार नाही. मी लहान असताना पाकिस्तान प्रगतीपथावर होता. परंतु पाकिस्तान वेगाने अधोगतीकडे प्रवास करू लागल्यामुळे पाकिस्तानचं नाव जगभरात खराब होऊ लागलं. आम्ही शांतता राखण्यामध्ये अमेरिकेसोबत असल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं.

नवाझ शरीफ जीव वाचवण्यासाठी मोदींना लपूनछपून भेटायचे

इम्रान खान यांनी जनतेला संबोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ जीव वाचवण्यासाठी मोदींना लपूनछपून भेटायचे, बरखा दत्त यांच्या पुस्तकात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नवाझ शरीफ नेपाळमध्ये नरेंद्र मोदी यांना लपूनछपून भेटायचे, असा गंभीर आरोप खान यांनी केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच सभागृह तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास प्रस्तावावर ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Updates : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट; १८३ नवे रुग्ण, तर एक रूग्णाचा मृत्यू