कोरोनाचं संकट म्हणजे भारतासाठी टर्निंग पॉइंट! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

pm narendra modi

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारतचा नारा देणारं संबोधनपर भाषण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑनलाई कार्यक्रमात केलं. यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि भारतीय कशा पद्धतीने या संकटाचा सामना करत आहेत आणि करणार आहेत, त्याविषयी देखील भाष्य केलं…

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आपण सगळे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहोत. आपण कोणत्या संकटाचा कसा सामना करतो, यावर आपल्याला भविष्यात येणाऱ्या संधी ठरतात.

आपली इच्छाशक्तीच आपला पुढचा मार्ग ठरवणार आहे. जो आधीच हार मानतो, त्याच्यासमोर नव्या संधी येत नाहीत. पण जे जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, त्यांच्यासमोर नव्या संधी जास्त येतात.

मित्रांनो, ही आपली संकल्पशक्ती, आपली इच्छाशक्ती आपली खूप मोठी शक्ती आहे. संकटावरचं एकच औषध असतं, ते म्हणजे मजबुती. संकटाच्या वेळी भारताचं सामर्थ्य अधिक वाढलं आहे. देशवासियांना ऊर्जा दिली आहे.

कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आलंय. कोरोना योद्ध्यांसोबत आपला देश या लढाईत जराही मागे नाही. पण या सगळ्यात प्रत्येक देशवासीयाने आता हा संकल्प केला आहे की या संकटाला संधीमध्ये परावर्तीत करायचं आहे. याला आपल्याला देशाचा खूप मोठा टर्निंग पॉइंट बनवायचा आहे. हा टर्निंग पॉइंट म्हणजे आत्मनिर्भर भारत.

आपण पाहातो, की कुटुंबात देखील मुलं १८-२० वर्षांची होतात, तेव्हा आई-वडील त्याला किंवा तिला सांगतात की आपल्या पायावर उभं राहायला हवं. त्यामुळे आत्मनिर्भर व्हायचा पहिला धडा आपल्या कुटुंबापासूनच सुरू होतो. भारताला देखील आत्मनिर्भर व्हावं लागेल. याचा अर्थ भारत दुसऱ्या देशांवर आपलं अवलंबित्व कमीत कमी करेल. ज्या गोष्टी आपण आयात करतो, त्या गोष्टी भारतात कशा बनतील यासाठी आपल्याला वेगाने काम करायचं आहे.

आपल्या लोकलसाठी व्होकल व्हायची आता वेळ आली आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य, आख्खा देश आत्मनिर्भर करण्याची गरज आहे.

केंद्र सरकार आणि अर्थमंत्रालयाकडून ज्या योजना जाहीर झाल्या आहेत, त्यांचा फायदा घेण्यासाठी देशभरातल्या उद्योजकांनी पुढे यायला हवं. शेती क्षेत्रासाठी ज्या घोषणा झाल्या आहेत, त्यातून देशातल्या शेतकऱ्यांना खरं स्वातंत्र्य मिळालं आहे. शेतकऱ्यांना आपलं पीक देशात कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. शेतकरी आणि उद्योजकांमध्ये पार्टनरशिपची जी सुरुवात करण्यात आली आहे, त्यातून उद्योग जगत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल.