एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या अनेक बातम्या कानांवर पडत असताना दुसरीकडे काही अजब घटना देखील समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून एका क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तींची सोय व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तिथेच सेक्स रॅकेट सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी तातडीने कारवाई केली. मात्र, या घटनेमुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.
हा प्रकार घडला आहे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या लोकांना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. पण याच हॉटेलमध्ये अचानक अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. याची कारणं शोधताना आरोग्य प्रशासनाला समजलेल्या कारणामुळे त्यांना धक्काच बसला. या हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलेल्या लोकांमध्ये सेक्स रॅकेट सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यासंबंधी तातडीने पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं.
या प्रकारामुळे हॉटेलमधून शेकडो जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. मे आणि जून या दोन महिन्यात इथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सुरक्षा रक्षकांनी इथे हलगर्जीपणा दाखवल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. सुरक्षा रक्षकाच्या दुर्लक्षामुळेच हॉटेलमध्ये सेक्स वर्कर्स दाखल झाले, असा आरोप देखील केला जात आहे.