घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींची नौटंकीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कारण, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींची नौटंकीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कारण, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

कोरोना रोखण्यासाठी फक्त मास्क आणि लॉकडाऊन हा उपाय नाही - राहुल गांधी

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे मृत्यूचा दर वाढलाय. वाढत्या कोरोनाचं संकट हाताळण्यामध्ये केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी अपयशी ठरले असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट केवळ मोदी सरकारच्या नौटंकीपणामुळे आली आहे अशी टीका देखील राहुल गांधींनी केली आहे. देशात कोरोनामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे परंतु सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही आहे. कोरोना केवळ एक आजार नसून तो कालांतराने बदलत जाणारा आजार असल्याचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या संकटावर भाष्य करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर आणि देशाच्या कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारला काँग्रेसकडून अनेकवेळा पत्र पाठवण्यात आली परंतु केंद्र सरकारने या पत्रांकडे दुर्लक्ष केले, सरकारने पत्रांना गांभीर्याने घेतले नाही असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना कोरोना अजूनही समजलाच नाही आहे. कोरोना फक्त एक आजार नसून तो कालांतराने बदलणारा आजार आहे. त्यामुळे जेवढा वेळ या आजाराला देऊ तेवढा तो घातक परिणाम करेल. यामुळे काँग्रेसकडून मागेच सांगण्यात आले होते की, लॉकडाऊन करा, सार्वजनिक ठिकाणं बदं करा, लोकांना घरातच राहू द्या परंतु केंद्र सरकारने काहीही ऐकले नाही असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

केंद्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नौटंकीपणा हाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत आहे. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी ही खोटी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे केंद्र सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी अशी मागणी त्यांनी केली. कोरोना रोखण्यासाठी केवळ मास्क आणि लॉकडाऊन हाच उपाय नाही आहे. या आजाराला रोखण्यासाठी काही प्रकार असल्याचे राहुल गांधी यांनी सुचवले आहे.

- Advertisement -

कोरोना रोखण्यासाठी प्रकार

कोरोना रोखण्यासाठी फक्त मास्क आणि लॉकडाऊन हा उपाय नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. कोरोना रोखण्यास लस हा कायमस्वरुपी उपाय आहेच. परंतु लॉकडाऊन हे हत्यार आहे. पण लॉकडाऊनमुळे सर्वसामान्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. तर मास्क, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन हे तात्पुरते उपाय आहे. काँग्रेसशासित राज्यांना कोरोनाची आकडेवारी न लपवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आपण जर कोरोनापासून पळ काढला तर त्याच्यासोबत लढू शकणार नाही. या विषाणूला थोडीही जागा द्यायची नाही. यामुळे सत्य माहिती असेल तर कोरोनावर विजय मिळवता येईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -