“साराभाई वर्सेस साराभाई 2” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे हिमाचल प्रदेशमध्ये एका रस्ते अपघातात निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई मधील जॅस्मिनची भूमिकेमुळे तिने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली होती.

‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये जॅस्मिनची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyay) हिचे मंगळवारी सकाळी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगड येथे राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांकडून तिचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे. वैभवी हिच्या पार्थिवावर आज बुधवारी (ता. 24 मे) सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (“Sarabhai Vs Sarabhai 2” famous actress died in a car accident)

हेही वाचा – “मी नेहमी CSK च्या संघात असेन पण…”, निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने टाकला पडदा

साराभाई व्हर्सेस साराभाई टेक 2 या मालिकेमध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांच्याकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला आहे. वळण घेत असताना वैभवीची गाडी दरीत पडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वैभवीचा होणारा नवराही त्यावेळी तिच्यासोबत कारमध्ये होता. सुदैवाने तो या अपघातातून बचावला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी ही घटना उत्तर भारतात घडल्याचे सांगितले. जेडी मजेठिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आयुष्य खूप अप्रत्याशित आहे. एक अतिशय चांगली अभिनेत्री, प्रिय मैत्रिण वैभवी उपाध्याय, जी साराभाई वर्सेस साराभाईची ‘जस्मिन’ म्हणून ओळखली जाते, तिचे उत्तरेतील एका अपघातात निधन झाले आहे. तिचे कुटुंबीय उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता तिचे पार्थिव मुंबईत अंत्यसंस्कारासाठी आणणार आहेत. वैभवीच्या आत्म्याला शांती लाभो.”

वैभवी उपाध्याय हिने 2020 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘छपाक’ आणि ‘तिमिर’ (2023) या चित्रपटांमध्ये काम केले होते. गुजराती थिएटरमध्ये सुद्धा वैभवी लोकप्रिय होती. टीव्ही शो ‘साराभाई वर्सेस साराभाई’ व्यतिरिक्त, वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या वेब सिरीजमध्ये काम केले होते. दोनच दिवसांपूर्वी हिंदी टिव्ही मालिकेतील अभिनेता आदित्य सिंह राजपूतच्या अचानक निधनाच्या आलेल्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वांना धक्का बसला होता. त्यानंतर आता लगेचत वैभवीच्या अपघाती मृत्यूने टीव्ही इंडस्ट्रीने तीन दिवसांत दोन कलाकार गमावले आहेत.