घरदेश-विदेशशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; शरद पवारांची मोदींकडे मागणी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; शरद पवारांची मोदींकडे मागणी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन राज्यातल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई आणि कर्जमाफी मिळावी, अशी मागणी करणारं निवेदन सादर केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी कुणाला पाठिंबा देणार? भाजपला की शिवसेनेला? याची उत्कंठा सिगेला पोहोचली असतानाच या सगळ्या गोंधळात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भातच ही भेट असल्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या भेटीमध्ये शरद पवारांनी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्येविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन दिलं असून शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेविषयीचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

- Advertisement -

‘सध्याची मदत अपुरी’

दरम्यान, सरकारने आत्ता शेतकऱ्यांना दिलेली मदत अपुरी असल्याचं शरद पवारांनी या निवेदनात म्हटलं आहे. ‘महाराष्ट्र सरकारने नुकतंच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. शेतीसाठी ८ हजार प्रति हेक्टर आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत त्यांचं नुकसान भरून देण्यासाठी खूप अपुरी आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजचं पुढे काहीही झालं नाही’, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘सरसकट कर्जमाफी द्या’

‘अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याची तक्रार केली आहे. त्यातच सध्याच्या अवकाळीमुळे देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आधीच्या कर्जमाफीसोबतच या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळावी’, अशी मागणी शरद पवारांनी या निवेदनात केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे शेतकऱ्यांना देण्याच्या मदतीसंदर्भात पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं, असं देखील या निवेदनात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -