अदानींच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचं काय झालं? – सचिन पायलट

Congress Leader Sachin Pilot
अदानींच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचं काय झालं? - सचिन पायलट

मुंबईत एनसीबीच्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज पार्टीत सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वी अदानी यांच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जवरुन सावल उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, परंतु मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ड्रग्जवर कोणतीही चर्चा नाही. युवक दिल्ली आणि मुंबईत ड्रग्ज घेत आहेत, त्यामुळे ड्रग्ज कुठून येत आहेत याबद्दल कोणी बोलत नाही. केंद्र सरकारने ड्रग्ज कुठून येत आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल पायलट यांनी केला.

मुंद्रा बंदरात २१ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. विशाखापट्टणम स्थित कंपनीने ऑर्डर दिल्याचे वृत्त आहे. तसं असल्यास ते गुजरात बंदरावर का उतरवले गेले, चेन्नई बंदरात का नाही? असा सवाल पायलट यांनी केला. सचिन पायलट म्हणाले की, तरुण पिढीला ड्रग्जकडे ढकलण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे आम्ही त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमचा विश्वास आहे की याआधीही इथून अनेक ठिकाणी कोट्यवधी किंमतीची औषधे पुरवली गेली आहेत. गुजरात आणि केंद्र सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पायलट यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे, असं पायलट म्हणाले.

केंद्र सरकारवर निशाणा

सामान्य माणूस अस्वस्थ आहे, महागाई वाढली आहे, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत, देशात निर्माण झालेले वातावरण भयावह आहे. केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही. सरकार केवळ प्रचार करून आपली पाठ थोपटत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची चर्चा करणाऱ्या सरकारचा पर्दाफाश केला जात आहे, असा हल्लाबोल पायलट यांनी केला.


हेही वाचा – लखीमपूर खेरी दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी; सचिन पायलट यांची मागणी