Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश इंधन दरवाढीला यूपीए जबाबदार, तर ७ वर्षांत तुम्ही बदल का केला नाही?

इंधन दरवाढीला यूपीए जबाबदार, तर ७ वर्षांत तुम्ही बदल का केला नाही?

सोनिया गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Related Story

- Advertisement -

देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतींना आपण नाही तर युपीए सरकार जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. यावर मग गेल्या सात वर्षांत तुम्ही का बदल केला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना झापले असताना आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

सोनियांनी लिहिलेल्या पत्रामध्ये पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही ‘ऐतिहासिक आणि अव्यवहारिक’ असल्याचे सांगत वाढते दर मागे घेण्याची मागणी केली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील इंधनाच्या किमती बेफाम वाढत आहेत. दुसरीकडे जीडीपी गटांगळ्या खात आहे. मात्र, केंद्र सरकार याचे खापर मागच्या सरकारांवर फोडण्यासाठी उतावीळ झाली आहे. सरकारने हे वाढते दर मागे घ्यावेत आणि सामान्य, नोकरदार, शेतकरी, गरिबांना याचा फायदा पोहोचवावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर टीका केली आहे. लोकांच्या त्रासातून फायदा कमवत असल्याचा आरोप केला आहे. इंधन आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला पत्र लिहीत असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.

एकीकडे भारतात नोकर्‍या, कमाई, आणि घरोघरीचे उत्पन्न कमी होत चालले आहे. मध्यम वर्ग आणि सामान्य लोक रोजीरोटी कमावण्यासाठी संघर्ष करत आहेत. या त्यांच्यासमोरील आव्हानात आता वाढत्या इंधनामुळे घरगुती साहित्य, अन्न-धान्यांच्या किमतीतही अभूतपूर्व वाढ होत आहे. या त्रासाच्या काळातही केंद्र सरकार लोकांच्या त्रासातून फायदा कमावण्याचा मार्ग निवडत असल्याचे दु:ख वाटत असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.

पवार काय म्हणालेे…

- Advertisement -

केंद्रात गेली सहा वर्षे तुमचे सरकार आहे. ठीक आहे, आमच्याकडून चुका झाल्या. तर सहा वर्षांत त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का, असा सवाल करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचे त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे, याबाबत विचारणा केल्यावर पवार म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असतानादेखील चुका दुरुस्त करता येत नसतील, तर त्यावर चर्चा काय करायची?

- Advertisement -