घरदेश-विदेशशबरीमाला परिसरात पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती

शबरीमाला परिसरात पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती

Subscribe

रविवारी सकाळपासून ११ महिला केरळच्या शबरीमाला मंदिराच्या दिशेने निघाल्या. दरम्यान, भाविकांनी या महिलांना अडविण्याचा प्रयत्न केला. भाविकांचा रोष बघता महिलांना तिथेच थांबावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी काही भाविकांना अटक केली आहे. शिवाय, २७ डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शबरीमाला मंदिराचा प्रश्न फार गाजताना दिसत आहे. या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी आहे. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्णय दिला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु, या आदेशानंतरही महिलांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे विविध महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांची ही आक्रमकता रविवारी सकाळी पुन्हा पाहायला मिळाली. त्यामुळे मंदिर परिसरात पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

रविवारी सकाळी ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ११ महिला जंगल मार्गाने केरळच्या शबरीमाला मंदिर परिसरात पोहोचल्या. या महिलांनी मदुराई येथून पायी यात्रा काढली होती. परंतु, मंदिरापासून ५ किलोमीटर अंतरावर मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी महिलांना मंदिराकडे जाण्यास मनाई केली. त्यांनी महिलांना अडवले. भक्तांकडून मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु होते. त्यामुळे महिलांना तिथेच थांबावे लागले. या घटनेनंतर शबरीमाला मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर विरोध करणाऱ्या भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

कोण आहेत ‘या’ महिला?

रविवारी सकाळपासून ११ महिला शबरीमाला मंदिराच्या दिशेला निघाल्या होत्या. या महिला चेन्नईच्या ‘मानिथी’ संघटनेच्या सदस्या आहेत. भगवान आयप्पाचे दर्शन घेतल्याशिवाय शबरीमाला मंदिर परिसरातून हटणार नाहीत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणामुळे महिलांना परत जाण्यास सांगितले आहे. परंतु, दर्शन झाल्याशिवाय आपण हलणार नाहीत, असे या महिला सांगत आहेत. दरम्यान, तणावग्रस्त परिस्थिती पाहता पोलिसांनी मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या गावात जमावबंदी लागू केली आहे. ही जमावबंदी २७ डिसेंबरपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शबरीमाला मंदिर परिसरात २२ डिसेंबरपर्यंत जमावबंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -