Terrorist Attack : बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या, १० वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी

Terrorist Attack TV actress amrin shot dead in Budgam, 10 year old nephew seriously injured
Terrorist Attack : बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या, १० वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी थैमान घातलं आहे. मध्यवर्तीय काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हुशरु येथे राहणाऱ्या टीव्ही अभिनेत्रीवर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorists fired) केला आहे. अभिनेत्री अमरीन भटची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात १० वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर पळ काढला आहे. अभिनेत्रीवर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

अभिनेत्री अमरीन भट तिचे व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर पोस्ट करत होती. श्रीनगर दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित झालेल्या काही मालिकांमध्ये आणि काही काश्मिरी गाण्यांच्या अल्बममध्ये अमरीनने काम केले आहे. बडगामच्या चादूपारामध्ये अमरीनचे घर आहे. घरात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच १० वर्षाच्या पुतण्याला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरीनवर लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे दहशवादी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड टीआरएफशी संबंधित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अभिनेत्रीच्या हल्ल्याचा राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी अमरीन बट यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. कोणत्याही महिला आणि बालकावरील हल्ला समर्थनीय नाही. ईश्वर अमरीन यांच्या आत्म्यास शांती देवो असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

बुधवारी पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी हत्या करण्यात आली आहे. बुधवारी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. पोलिसाची हत्या करण्यात आली असून त्याची मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे. कर्मचारी आपल्या घराबाहेर असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे.


हेही वाचा : Pakistan on boil : इम्रान खान यांच्या आझादी मोर्चाला हिंसक वळण, समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची