घरदेश-विदेशElectoral Bonds : मजूर ते ‘लॉटरी किंग’...सँटियागो मार्टिनचा अविश्वसनीय प्रवास

Electoral Bonds : मजूर ते ‘लॉटरी किंग’…सँटियागो मार्टिनचा अविश्वसनीय प्रवास

Subscribe

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रासह देशात इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांवरून राजकारण रंगले आहे. ऑनलाइन लॉटरीचा जुगार चालविणारी कंपनी फ्युचर गेमिंगकडून भाजपाला कोट्यवधींची देणगी देण्यात आल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, त्याला प्रत्युत्तर देताना भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी द्रमुकला सर्वाधिक देणगी मिळाल्याचा दावा केला आहे. असे असले तरी, ही कंपनी कुठली आणि कोणाची आहे, याचीच जास्त चर्चा आहे.

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या माहितीनुसार, सँटियागो मार्टिन यांनी राजकीय पक्षांना मोठी देणगी दिली आहे. मार्टिन हे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स या कंपनीचे मालक आहेत. लॉटरी व्यवसायात कार्यरत ही कंपनी देणगी देण्यात आघाडीवर आहे. विविध राजकीय पक्षांना या कंपनीनं देणगी दिली आहे.

- Advertisement -

‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस’च्या सँटियागो मार्टिनची गोष्ट ही फिल्मी आहे. मार्टिन म्यानमारमध्ये मजूर म्हणून काम करत होता. तिथून परतल्यानंतर 1988 मध्ये त्याने कोईम्बतूर येथे ‘मार्टिन लॉटरी एजन्सीज लि.’ स्थापन केली आणि लॉटरीचा व्यवसाय सुरू केला. त्याचा वापर करून घेत त्याने भारतातील सर्वात बडा लॉटरी व्यावसायिक होण्यापर्यंत मजल मारली.

‘लॉटरी किंग’ बनलेला म्यानमारमधील मजूर

59 वर्षीय मार्टिन यांनी म्यानमारमधून परतल्यानंतर 1988 मध्ये कोईम्बतूरमध्ये मार्टिन लॉटरी एजन्सीज लिमिटेडची स्थापना करत लॉटरी व्यवसाय सुरू केला. ‘लॉटरी मार्टिन’ हे त्याचे आणि त्याच्या व्यवसायाचे नाव घराघरात पोहोचले. त्या काळात येथे दोन अंकी लॉटरीची क्रेझ होती. कोईम्बतूरपासून सुरुवात करून, त्याने आपला व्यवसाय कर्नाटक आणि केरळमध्ये विस्तारला आणि अखेरीस सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रात काम करण्याची परवानगी मिळवली. सँटियागो यांनी भूतान आणि नेपाळमध्येही कंपनी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, मार्टिन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाईड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत. मेडिकल कॉलेजसह, हॉस्पिटल, म्यझिक चॅनल अशा विविध क्षेत्रात त्यांचे काम आहे. दरम्यान, मार्टिन यांना विविध प्रकारच्या गुन्ह्यात अटक देखील करण्यात आली होती. 4,500 कोटी रुपयांच्या फसणुकीचा आरोपही त्यांच्यावर होता. तसेच त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे देखील टाकले होते. त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bonds : पक्षदेणगीवरून प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – सर्वाधिक निधी…

‘लॉटरी मार्टिन’ या नावाला प्रसिद्धी कशी मिळाली?

पिनाराई विजयन आणि व्ही.एस. अच्युतानंदन यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील अंतर्गत कलहामुळे, सँटियागो मार्टिन हे नाव जास्त पुढे आले. केरळमधील डाव्यांची सद्दी संपवण्यासाठी ‘लॉटरी मार्टिन’ हे नाव बव्हंशी कारणीभूत ठरले.

देशातील 13 राज्यांमध्ये या कंपनीचा व्यवसाय

सँटियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स या कंपनीचा देशातील 13 राज्यांमध्ये व्यवसाय चालतो. त्यांच्या कंपनीत 1000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मार्टिन यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून लॉटरीचा व्यवसाय सुरू केला. इतक्या लहान वयापासून त्यांनी लॉटरी खरेदी आणि विक्रेत्यांचं मोठं जाळं तयार केलं.

हेही वाचा – Electoral Bond : सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी SBI ला पुन्हा सुनावले, सर्व तपशील द्यावा लागेल

बऱ्याच काळापासून ईडीच्या रडारवर

लॉटरी किंग’ मार्टिन अनेक वर्षे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर होता. त्याच्या ‘फ्युचर गेम्स अँड हॉटेल सव्‍‌र्हिसेस’ने एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या कालावधीत सर्वाधिक, म्हणजे 1,368 कोटींचे निवडणूक रोखे विकत घेतले. तमिळनाडूत 2003 मध्ये लॉटरीवर बंदी घालण्यात आली होती, तरीही अनेकांना ‘मार्टिन लॉटरी’ हे नाव अजूनही आठवते. मार्टिनच्या मालकीची ‘फ्युचर गेमिंग सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.’ ही ‘सिक्कीम लॉटरीज’ची मुख्य वितरक आहे. त्याने केरळमध्ये फसव्या लॉटरी विक्रीने सिक्कीम सरकारचे 900 कोटींपेक्षा जास्त नुकसान केल्याबद्दल 2003 मध्ये ईडीने त्याची सुमारे 457 कोटींची मालमत्ता गोठवली होती. सिक्कीम सरकारी लॉटरीच्या केरळमधील विक्रीच्या संबंधाने सीबीआयने मार्टिन आणि इतरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई केली होती.

मार्टिनच्या उद्योगांविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2019 रोजी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना पत्रे पाठवून चिंता व्यक्त केली होती. या पत्रानंतर 10 दिवसांच्या आत, ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स’ने 190 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकत घेतले. पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये लॉटरीला प्रतिबंध असतानाही मार्टिन ‘बेकायदेशीरपणे’ लॉटरी विकत होता. एका इंग्लिश वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ‘ईडी’ने कंपनी विरुद्ध 2019 च्या सुरुवातीला आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली होती. त्या वर्षी जुलैपर्यंत, कंपनीच्या मालकीची 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2 एप्रिल 2022 रोजी ‘ईडी’ने त्यांची 409.92 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली. त्यानंतर पाचच दिवसांनी ‘फ्युचर गेमिंग’ने 100 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -